संग्रहित छायाचित्र
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. मात्र, पुतळा नेमका का कोसळला यांचं कारण स्पष्ट नव्हतं. या घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुतळा कोसळण्याचं कारण स्पष्ट झालं आहे. पुतळा कोसळण्याला तीन कारणं महत्त्वाची मानली जात आहे. गंज, कमकुवत बांधणी आणि चुकीची वेल्डिंग. यामुळे पुतळा कोसळल्याचं तपासणी अहवालातून पुढे आलं आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आपला १६ पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. ३५ फुटांच्या पुतळ्याचा भार पेलू शकेल इतकी पुतळ्याची बांधणी मजबूत नव्हती. तसेच चुकीच्या पद्धतीने केलेलं वेल्डिंग आणि गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. तसंच पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल आणि दुरुस्ती झाली नाही असा ठपका देखील या अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.