संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता
#मुंबई
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा असून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर ‘केवळ अजित पवारच नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सध्या अस्वस्थता आहे,’’ असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी (दि. १७) केला.
अजित पवार भाजपमध्ये जाणार, या चर्चेला सध्या ऊत आला आहे. अजित पवार खरंच भाजपमध्ये येणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी कराड यांना विचारला. त्यावर थेट उत्तर न देता सूचकपणे कराड म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ अजित पवार अस्वस्थ नाहीत, तर बहुतांश आमदार अस्वस्थ आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अस्वस्थता आहे.’’
‘‘केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता असल्याचे कराड यांनी नमूद केले. काँग्रेसची स्थितीदेखील राष्ट्रवादीसारखीच आहे. त्याचबरोबर संपूर्ण ठाकरे गटात अस्वस्थता आहे. या गटाचे १५ आमदार पक्षात नाराज आहेत,’’ असा दावादेखील कराड यांनी केला.
कराड म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असण्याचे कारण म्हणजे, आमदारांची कामे होत नाहीत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण तिन्ही पक्षात चालू असते. महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हादेखील मविआच्या आमदारांची कामे होत नव्हती. त्यामुळेच संपूर्ण महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चांगली कामे करत आहेत. आमदारांची जनविकासाची कामे करून देण्यासाठी ते स्वत: पुढाकार घेतात. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे.’’
...तर अजित पवारांचे स्वागतच : बावनकुळे
अजित पवार भाजपमध्ये आले तर स्वागत कराल का, असा प्रश्न विचारला असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्यासाठी हा महिना प्रवेशाचा आहे. एप्रिल महिन्यात २५ लाख जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. बूथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरू आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. भाजपची विचारधारा मान्य असेल तर अजित पवारांचे स्वागतच आहे. आमच्या पक्षात आमच्या विचारधारेनुसार काम करावे लागते.’’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाविरोधात निकाल दिल्यास सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशात अजित पवारांना भाजपबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमित शहांसोबतच्या बैठकीत संभाव्य मंत्रिपदाच्या खातेवाटपाबाबत चर्चादेखील झाली, असे या वृत्तात म्हटले आहे.
वृत्तसंस्था