आता घरवापसीसाठी प्रयत्न?

महाराष्ट्रातील सध्याच्या अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाच्या खेळात प्रत्येक शक्यता तपासून पाहिली जात आहे. सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल याचिकेवर येत्या काही दिवसांत निर्णय देण्याची शक्यता आहे. या निकालाची संभाव्य शक्यता लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोडून गेलेल्या नाराज नेत्यांच्या घरवापसीचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 12:29 pm
आता घरवापसीसाठी प्रयत्न?

आता घरवापसीसाठी प्रयत्न?

नाराजांचे मन वळविण्यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, एका कॅबिनेट मंत्र्याला ऑफर दिल्याची चर्चा

# मुंबई 

महाराष्ट्रातील सध्याच्या अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाच्या खेळात प्रत्येक शक्यता तपासून पाहिली जात आहे. सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल याचिकेवर येत्या काही दिवसांत निर्णय देण्याची शक्यता आहे. या निकालाची संभाव्य शक्यता लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोडून गेलेल्या नाराज नेत्यांच्या घरवापसीचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

शिवसेनेला खिंडार पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेक जण मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यात शिवसेनेसह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. यापैकी काहींनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली, तर काहींनी ती व्यक्त करायचे टाळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांना तोंड देण्याबरोबरच नाराजांना सांभाळून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी तसेच विरोधकांनी पर्यायांची चाचपणी करून त्यानुसार डाव टाकायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची किंवा भाजपमध्ये न जाता सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा हा त्याचाच भाग आहे. या खेळात उद्धव ठाकरेही आपल्यापरीने डाव खेळत असून त्यांनी आपल्याला सोडून गेलेल्यांपैकी नाराजांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याला त्यांनी घरवापसीसाठी ऑफर दिली, अशी चर्चा राज्याच्या सत्ता वर्तुळात आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो. यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना गळ घालण्याचे काम सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले होते तेव्हा ‘या चिमण्यांनो परत फिरारे’ अशी साद  घातली होती. तोच प्रयोग आता उद्धव ठाकरे यांनी चालवल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या ४० पैकी काही आमदारांची यादी तयार केली आहे. यामध्ये  जे आमदार नाराज आहेत, ज्यांनी ठाकरेंवर टीका करायचे टाळले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पुन्हा निवडून येण्याची खात्री नसलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न ठाकरे गटाने सुरू केले आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या. आताही तेच सुरू आहे. कधी काय होईल, हे कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही, असे वातावरण आहे. यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी गटातील प्रत्येक घटक सर्व शक्यता तपासून आपल्या परीने डाव टाकत आहे. ठाकरे गटावर टीका न केलेल्या काही आमदारांसह एका कॅबिनेट मंत्र्याला ठाकरे गटात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांमार्फत याची कुणकुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागल्यानंतर खुद्द त्या मंत्र्याने ही ऑफर मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्याचे कळते.

नाराज आमदारांना आपल्याकडे परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून अद्याप तरी कोणीही थेट वक्तव्य केलेले नाही. दुसऱ्या बाजूने, ठाकरे गटाकडून काही ऑफर आल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनीही जाहीर केलेले नाही. ते बोलायला तयार नाहीत.  

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्तेचा सारीपाट मांडला.   आपल्याला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल असे अनेकांना वाटले होते. शिंदे यांनी बहुतेकांना ‘तुम्हाला मंत्री करतो,’ असे आश्वासन देऊन आपल्यासोबत नेल्याचीही चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात असे झालेले नाही. राजेंद्र यड्रावार, बच्चू कडू यांच्यासारख्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांना मागील नऊ महिन्यांपासून मंत्रिपद हुलकावणी देत आहे. त्यांच्यासह अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी रोखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रमाणात यश आले आहे. असे असले तरी या नाराजीमागच्या संभाव्य धोक्याची कल्पनाही त्यांना आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या काही आमदारांची घरवापसी झाली तर राज्यात ठाकरेंच्या बाजूने वातावरण निर्मिती होईल. यासाठी ठाकरे गटाने गुप्तता पाळून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest