File Photo
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आज (३० सप्टेंबर) झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गायीला राज्य माता-गोमातेचा दर्जा घोषित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आल्याने शिंदे सरकारचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचे मानले जात आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचे विविध हिंदू संघटनांनी स्वागतही केले आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच हा निर्णय घेतला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तसेच राज्यात देशी गायी घटल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचे अद्वितीय महत्त्व होते. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटले गेले. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. मराठवाड्यात देवनी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गवलाऊ आदी जाती आढळतात.
पण राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्याही कमी होताना दिसत असल्याचे जीआरमध्ये म्हटले आहे. दरम्यान राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रती गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांना मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
देशी गायीचे दूध पौष्टिक असते. मानवी पोषणासाठी देशी गायीचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. मानवी आहारातील दुधाचे महत्त्व, आयुर्वेद चिकित्सेतील पंचगव्याचे महत्त्व, जैविक शेतीसाठी शेण आणि गोमूत्राचे महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले आहे.
राज्य सरकारने गायींना राज्यमाता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना आता संरक्षण प्राप्त होईल. गेली अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती, मागणीला यश आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून अभिनंदन करणार आहेत, असे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री विंद शेंडे यांनी म्हटले आहे.