NCP Chief Minister : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार

सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या प्रकरणावर लवकरच निर्णय देणार असल्याने सध्याचे भाजप-शिंदे गटाचे सरकार जाणार की राहणार, यावर चर्चा सुरू असतानाच ‘‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसचाच असेल,’’ असे जाहीर वक्तव्य करून या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी (३० एप्रिल) खळबळ उडवून दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 12:52 pm
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार

सहकारी पक्षांनी ही गोष्ट मान्य केल्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

#मुंबई

सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या प्रकरणावर लवकरच निर्णय देणार असल्याने सध्याचे भाजप-शिंदे गटाचे सरकार जाणार की राहणार, यावर चर्चा सुरू असतानाच ‘‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसचाच असेल,’’ असे जाहीर वक्तव्य करून या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी (३० एप्रिल) खळबळ उडवून दिली.  

राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होऊन राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह जयंत पाटील अशी अनेक नावे चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याचं जाहीर वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी आता केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सहकारी पक्षांनी मान्य केलं आहे. भविष्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे येईल,’’ असे मत कराड येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी व्यक्त केले.  

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील,’’ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं होतं. शिवाय जयंत 

पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना आमच्यासोबत लोकसभेत पाठवा, असं आवाहनही कोल्हे यांनी यावेळी केलं होतं. सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला होता. यावर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, ‘‘जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं ते वक्तव्य प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होतं. त्यामागे वेगळा कोणताही उद्देश नाही. अजित पवार आणि माझ्यात किंवा पक्षात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत.’’वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest