परभणी : महाविकास आघाडीसमोर 'वंचित'चे आव्हान

परभणी जिल्ह्यात यंदा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नाकीनऊ आणले आहेत. महाविकास आघाडीच्याच माणसांना हाताशी धरून करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रकार सुरू असल्याने ही मंडळी सध्या हैराण झाल्याचे चित्र आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 9 Nov 2024
  • 06:13 pm

लोकसभेला जमलेले गणित विधानसभेत बिघडणार, महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर

परभणी जिल्ह्यात यंदा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नाकीनऊ आणले आहेत. महाविकास आघाडीच्याच माणसांना हाताशी धरून करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रकार सुरू असल्याने ही मंडळी सध्या हैराण झाल्याचे चित्र आहे. गंगाखेड व जिंतुरात हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे लोकसभेला जमलेले आघाडीचे गणित विधानसभेत बिघडण्याची भीती आहे.

लोकसभेला चारपैकी तीन मतदारसंघांत महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य होते. यावेळी वंचित त्याच्या आड येण्याची भीती आहे. परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्जच बाद झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे. या ठिकाणी उद्धवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्यासमोर त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आनंद भरोसे शिंदेसेनेकडून आले आहेत. मात्र, जिंतूरमध्ये ‘वंचित’चा उमेदवार मागच्या वेळीपेक्षा चांगलाच दमदार आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीची मंडळी चिंतेत पडली आहेत.दिवंगत माजी आ. कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे यावेळी होमग्राउंडवर ‘वंचित’कडून खेळत आहेत. त्यांनी काँग्रेसची यंत्रणाही ब-यापैकी सोबत घेतली. त्यामुळे आघाडीला खडतर मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

गंगाखेडमध्येही असेच काहीसे चित्र आहे. महाविकास आघाडीची ‘वंचित’कडून आलेल्या माजी आ. सीताराम घनदाट यांच्यामुळे दमछाक होत आहे. लोकसभेला आधीच आघाडीसाठी मायनस गेलेल्या या मतदारसंघात घनदाट यांची चौफेर घुसखोरी सुरू आहे. यात आघाडीच नव्हे, महायुतीचीही दमछाक होत आहे. पाथरीतही ‘वंचित’कडून सुरेश फड हे उमेदवार असले, तरी ते गंगाखेडमधून ऐनवेळी येथे आल्याने किती प्रभावी ठरतील, असा प्रश्न आहे. शिवाय या मतदारसंघात आधीच बहुरंगी लढत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest