संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा ऊषा तांबे आणि सर्व सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ गोऱ्हे यांनी सांगितले की, लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या डॉ. भवाळकर यांची निवड ही महत्त्वपूर्ण घटना आहे. डॉ भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांवर केलेला गाढ अभ्यास आणि लेखनाचे महत्त्व डॉ गोऱ्हे यांनी नमूद केले.
मराठी साहित्य संमेलनाच्या ९८ वर्षांच्या इतिहासात फक्त पाच महिलांनी अध्यक्षपद भूषवले आहे, याकडे लक्ष वेधून डॉ गोऱ्हे म्हणाल्या, आता सहाव्या महिलेसाठी डॉ. तारा भवाळकर यांची योग्य निवड झाली आहे. गोऱ्हे यांनी डॉ. भवाळकर यांच्यासोबतच्या सामाजिक कार्यक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, यावर्षीच्या साहित्य संमेलनात केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. डॉ गोऱ्हे यांनी आशा व्यक्त केली की, या निर्णयामुळे पुन्हा ठराव न करता त्याबद्दल कार्यवाही केली जाईल.