Question paper : प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा खोटा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा आयोगाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 01:53 pm
प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा खोटा

प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा खोटा

एमपीएससीचे स्पष्टीकरण, सुमारे एक लाख हॉलतिकिटे टेलिग्रामवर लीक

#मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा आयोगाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

परीक्षेआधीच सुमारे एक लाख हॉलतिकिटे टेलिग्रामवरून लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २३) समोर आला. ही बाब एमपीएससीने मान्य केली आहे. ‘‘उमेदवारांची हाॅलतिकिटे लीक झालीत, हे खरे आहे. मात्र, प्रवेशपत्राशिवाय कोणतीही माहिती फुटलेली नाही. प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा धादांत खोटा आहे,’’ असे एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकात  नमूद केले आहे.  

नक्की प्रकरण काय?

एमपीएससीच्या परीक्षेआधीच सुमारे एक लाख हॉलतिकिटे टेलिग्रामवरून लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर उमेदवारांची हॉलतिकिटे लीक झाल्याचे समोर आल्यानंतर नेटकरी त्यावर संताप व्यक्त करत आहेत. ‘‘प्रश्नपत्रिका फुटली नसली तरी या घटनेमुळे उमेदवारांच्या डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे,’’ अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.

दरम्यान, ही हॉलतिकिटे लीक करणाऱ्या टेलिग्राम चॅनेलच्या अॅडमिनविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले.

नियोजित परीक्षेची हॉलतिकिटे बाह्यलिंकद्वारे लीक झाली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर हॉलतिकीट बाह्यलिंकद्वारे डाऊनलोड करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. ‘‘संबंधित चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशपत्रे वगळता उमेदवारांचा वैयक्तिक डेटा तसेच प्रश्नपत्रिका असा कोणताही डेटा लीक झालेला नाही. तज्ञांकडून याची खात्री करण्यात आली आहे,’’ असा खुलासा एमपीएससीने केला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीनुसार डाऊनलोड करण्यात आलेली प्रवेशपत्रे असणाऱ्या उमेदवारांनाच परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest