संग्रहित छायाचित्र
सोलापूर प्रतिनिधी : गड्डा यात्रेला होम मैदान देण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान समितीने यंदा पहिल्यांदाच निविदा पद्धत अवलंबली आहे. सोमवारपासून ९ डिसेंबरपर्यंत निविदा मागवल्या आहेत. मंदिर समितीच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांचे अर्ज मिळतील, असे समितीने कळवले आहे.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेसाठी महापालिकेच्या ताब्यातील व मैदान समितीच्या ताब्यात देण्यात येते. एक महिन्याच्या कालावधीसाठी मिळणाऱ्या या मैदानावर आनंदमेळा भरत असतो. मक्तेदाराकडून यात्रापट्टीच्या नावाने काही रक्कम घेऊन मैदान देण्याची पद्धत होती. गेल्या वर्षी एका स्थानिक मक्तेदाराने लिलाव अथवा निविदा पद्धतीने मैदान देण्याची मागणी केली होती. ज्या मक्तेदाराला मंदिर समितीने मैदान दिले होते त्याच्यापेक्षा अधिक रक्कम देण्यास तयार असूनही मैदान मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याच्या तक्रारी धर्मादाय उपायुक्तांपर्यंत गेल्या होत्या. पुण्याच्या सह-आयुक्तांनी निविदा पद्धत अवलंबण्याचे आदेशही काढला होता. परंतु तोपर्यंत यात्रेला प्रारंभ झाला होता. तक्रारी तडजोडीने निकाली काढण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने यंदा मैदान लिलाव पद्धतीने घेण्याची सुविधा जाहीर केली. यात्रा पार पाडण्यासाठी महापालिका होम मैदान देवस्थानच्या हवाली करते. तेथे यात्रा भरते. तसेच प्रमुख विधी होतात. एक महिन्यासाठी हे मैदान देवस्थानच्या ताब्यात देते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.