संग्रहित छायाचित्र
नाशिक : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरु असतानाच आता नाशिक आणि जळगाव या तुलनेने सुपीक समजायला जाणाऱ्या जिल्ह्यांतही आता आत्महत्यांचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या ८ महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात एकूण २३० शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी सर्वाधिक १३७ आत्महत्या या एकट्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ९७ शेतकऱ्यांचे कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरले असून, ४८ शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने ते सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर, नापिकी आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या ८ महिन्यांच्या काळात नाशिक विभागात एकूण २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. सर्वाधिक आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. याठिकाणी १३७ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांच्या काळात आत्महत्या झाली नाही, असा एकही महिना उजाडला नाही.
का उचलले जातेय टोकाचे पाऊल?
केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या ८- १० महिन्यांत नैराश्यातून १३७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शासकीय आकडेवरीतून ही माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मनोधैर्य पुरते खचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.