संग्रहित छायाचित्र
सोलापूर : तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळ आणि राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला. त्यामुळे रविवारी (१ डिसेंबर) दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरीचा शिरकावही झाला त्यामुळे सोमवारची पहाट उजडण्यापूर्वीच सोलापूर बाजार समितीच्या आवारात ५८७ ट्रक कांदा दाखल झाला.
५८ हजार ७०८ क्विंटल कांद्याचा सोमवारी सकाळी लिलाव झाला. क्क्विंटलला किमान ५००० ते कमाल ७००० रुपयांचा दर मिळाला.ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून चाळणीला ठेवलेला होता तो भिजण्याच्या भीतीने बाजारात आणला. याशिवाय चांगला दर असल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. रविवारी बाजार समितीला सुट्टी होती. तरी देखील रात्रीच काही वाहने येऊन धडकली होती. सोमवारी पहाटे तर रिघच लागली होती.सकाळीच कांद्याचे लिलाव झाले त्यानंतर वाहने बाहेर पडण्यास सुरुवात झाली. एका मागून एक वाहने बाहेर येत असल्याने हैदराबाद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस आणि बाजार समितीच्या सुरक्षारक्षक रस्ता करून दिल्याने कोंडी फुटली.
एका दिवसात पंधरा कोटींची उलाढाल
सोमवारी ५८७ गाड्यांतून कांदा मार्केटयार्डात आला. मागच्या आठवड्यात ३०० गाड्या कांदा आला होता. जुन्या कांद्याला ५ हजार रुपये दर मिळाला. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला होता. आगामी काही दिवसांत अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.