संग्रहित छायाचित्र
सोलापूर प्रतिनिधी : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी (दि. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. निवडणुका जिंकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही. कारण, त्यांना माहीत आहे की, ते ईव्हीएम मॅनिप्युलेट करून निवडणुका जिंकले आहेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही नाही, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी षडयंत्र केले आहे. ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती. तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, असे प्रणित शिंदे म्हणाल्या.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले, आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असते. पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे. तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कारण ते मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅन्यूपुलेट करून १३३ च्या जवळपास पोहोचले आहेत. त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही, तुम्ही निरीक्षण करून बघा, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. दरम्यान, एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव जागा देखील गमावल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन जागा लढवल्या होत्या, मात्र येथील मतदारसंघातील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
उद्याचा दिवस आपलाच
झाले गेले विसरा हे दिलेले काम करा, अशा शब्दांत कार्यकर्त्यांच्या मनात आशावाद जागवण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. सोमवारी होणारी बैठक रद्द करून अचानक रविवारी (१ डिसेंबर) दुपारी काँग्रेस भवनमध्ये बैठक घेत त्यांनी भूमिका मांडली.जय-पराजय होतच असतात. पराभवामुळे खचून न जाता आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचे शिंदे म्हणाल्या.