संग्रहित छायाचित्र
सावंतवाडी : मालवणसह सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.
थंडीचा हंगाम सुरु झाल्यावर युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर दाखल होतात. सध्या हे पक्षी मालवणसह दांडी, वायरी, देवबाग, भोगवे आदी किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. हे पक्षी निर्जन समुद्र किनाऱ्यांना पसंती देतात. समुद्र किनाऱ्यावर मिळणारे मासे, किडे, शिंपल्यातील जीव हे या पक्ष्यांचे अन्न आहे. हे पक्षी थव्याने उडत राहून किनारा बदलत राहतात किंवा पाण्यात बसून राहतात. किनाऱ्यावरील या पक्ष्यांच्या वावरामुळे विलोभनीय दृश्य निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे सीगल पक्ष्यांनी गजबजून गेले असून या सिगल पक्ष्यांचा मुक्काम हा दोन ते तीन महिने राहणार आहे. सध्या सिंधुदुर्गात पर्यटकांची रेलचेल वाढली असतानाच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे थवे उडताना दिसू लागल्याने या दृश्याचा पर्यटक आंनद लुटत असतानाच थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत. तर सिगल पक्ष्यांचे आगमन हे पक्षी प्रेमी व अभ्यासकांसाठी देखील एक पर्वणी ठरली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.