संग्रहित छायाचित्र
नागपूर : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. हा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी खात्री नागपूरकरांना वाटत असून एका टेलरने त्यांच्यासाठी आवडत्या चार रंगाचे कोट शिवले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कपडे शिवणाऱ्या एका टेलरने फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या आवडीच्या रंगाचे चार कोट शिवले आहे. यातील एक कोट घालून त्यांनी शपथ घ्यावी, अशी इच्छा या टेलरने व्यक्त केली आहे. पिंटू मेहाडिया असे या टेलरचे नाव आहे. मेहाडिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ४ कोट तयार केले आहे. ते त्यांनी शपथविधी सोहळ्याला घालावे अशी त्यांची इच्छा आहे. हे कोट घेऊन ते मुंबईला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे नेहमी मेहाडिया यांच्या 'गोविंदा कलेक्शन' येथून त्यांचे कोट शिवत असतात. फडणवीस जेव्हा नागपूरचे पहिल्यांदा महापौर झाले तेव्हासुद्धा त्यांनी मेहाडिया यांच्या दुकानातूनच कोट शिवून घेतला होता. फडणवीस यांना निळा रंग आवडतो. त्यांची ही आवड पिंटू मेहाडिया यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी निळ्या रंगाच्या तीन छटांमधील वेगवेगळे कोट शिवले आहेत. यातील एक कोट हा राखाडी रंगाचा आहे. तर गुलाबी रंगाचा देखील समावेश आहे. त्यांनी गुलाबी रंगाबाबत देखील फडणवीस यांना एकदा विचारले होते. त्यावेळी त्यांनी ते नेहमी वेगवेगळ्या रंगाचे कोट घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. गुलाबी रंगाचाही कोट जॅकेट घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्यांचे कोट शिवले आहेत.
चहाविक्रेत्यालाही शपथविधीचे आमंत्रण
राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधीचे आमंत्रण आले आहे. गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आमंत्रण पाठवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या चहाविक्रेत्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोही लावला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना गोपाळ बावनकुळे म्हणाले की, ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पास पाठवला आहे. मी आवर्जुन उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण दिले आहे. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.