संग्रहित छायाचित्र
सोलापूरमधील माळशिरस मतदार संघातील मारकडवाडी हे गाव चर्चेत आले आहे. माळशिरस मतदार संघातील या गावाने ईव्हीएमचा निकाल नाकारून बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी केली आहे. सर्व खर्च भरू, परंतु बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या अशी विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाला केली होती. मात्र ती नाकरल्याने ग्रामस्थांनी स्वत:च निवडणुकीची तयारी केली आहे. बॅलेट पेपरवर निवडणूकीसाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली होती. मंगळवारी (३ डिसेंबर) हे मतदान पार पडणार होते. त्यामुळे वातावरण चिघळले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सोमवारी मारकडवाडी गावात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. तरीही मारकडवाडी गावातील ग्रामस्थ मतदानप्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. त्यानुसार मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरु झाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, चर्चा केली आणि बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी का?
माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांच्यात लढत झाली. मात्र भाजपच्या राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर मारकडवाडी ग्रामस्थांचा आक्षेप घेतला आहे. गावात एकूण २४७६ मतदान असून, विधानसभा निवडणुकीत १९०५ मतदान झाले. त्यात राम सातपुते यांना १००३, तर उत्तम जानकर यांना ८४३ मतदान झाले आहे. आमच्या गावात १६५ मतांचा फरक झाला आहे. आतपर्यंत जानकर आणि मोहिते- पाटील यांनाच गावाने मताधिक्य दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र राम सातपुते यांना मताधिक्य गेल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जमावबंदी लागू
पोलिसांनी मारकडवाडी गावात १४४ कलम लागू करून जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. मतदान केले तर मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करण्याचा तसेच गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. उत्तमराव जानकर यांनी मध्यस्थी करत मतदानदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे हे बॅलेट पेपरवर घेतले जाणारे हे मतदान केवळ स्टंटबाजी असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.