संग्रहित छायाचित्र
सोलापूर : सोलापूर विमानतळाच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरत असून विमानतळाच्या कामाची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे. या कामाबाबत फ्लाय ९१ एअरलाईन्स कंपनीकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या विमानसेवेनंतर शहराच्या आर्थिक उलाढालीतही सकारात्मक बदल दिसून येईल, असा विश्वास उद्योगजगताकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फ्लाय ९१ एअरलाईन्सचे जनरल मॅनेजर सेल्स व चीफ रेव्हेन्यू ऑफिसर आशुतोष चिटणीस हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक व विकास मंचचे सदस्य केतन शहा यांची भेट घेती. शहा यांच्यासोबतच्या बैठकीत सोलापूर विमानतळाच्या विकासाबाबत चरचा करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई तसेच मुंबई ते सोलापूर, सोलापूर ते गोवा या विमानसेवेबाबत सविस्तर चर्चा झाली व पुढील नियोजनासाठी काय करण्यात यायलाच हवे, यावर चर्चा करण्यात आली. सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे, असे मत चिटणीस यांनी व्यक्त केले.
सध्या पुणे ते गोवा एक फेरी सुरू आहे व लवकरच शनिवार व रविवारी दोन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पुणे ते गोवा सर्व फ्लाईट फुल्ल जात आहेत. सोलापूर व आजूबाजूच्या जिल्ह्यातून प्रवासी होटगी रोड विमानतळावरून गोवा व मुंबई येथे जातील. सोलापूरची आर्थिक उलाढाल नक्की वाढेल व नवीन उद्योजक तसेच आयटी क्षेत्र वाढेल, असा विश्वास यावेळी केतन शहा यांनी व्यक्त केला. लवकरच तिकीट विक्री सुरू होईल व व्यापारी उद्योजकांची एक बैठक घेण्यात येईल, असे शहा यांनी चिटणीस यांना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.