संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून बिघडली असून मंगळवारी तपासणीसाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी सुरू केली असून काही दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे. शिंदे यांच्या डेंग्यू आणि मलेरियाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी-जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मिळत आहे. सततच्या तापामुळे त्यांना अँटीबायोटिक्स सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अशक्तपणा जाणवत आहे. डॉक्टरांच्या टीमने पुढील उपचारांसाठी तयारी केली आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंदे दोन दिवस गावात होते. मुंबईत परतल्यावर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावरून अद्याप निर्णय झालेला नसून उपमुख्यमंत्री पद व गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनीही शिंदे यांना गृहमंत्री पद देण्याची मागणी केली होती. तसेच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार असून या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नव्या सरकार स्थापनेची तयारी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रकृतीमुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्र्याची भूमिका निभावत आहेत. नव्या सरकारमध्ये शिंदे यांची भूमिका काय असेल, यावर चर्चा रंगली आहे. ते उपमुख्यमंत्री होणार की केंद्रात स्थान मिळवणार, याबाबत उत्सुकता आहे. दिल्लीमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकींमध्ये ठोस निर्णय झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.