Covid : कोविड रोखण्यासाठी पुन्हा टास्क फोर्स

देशात कोविड १९ या जिवघेण्या आजाराचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. राज्यातही या आजाराचा संसर्ग लक्षणीयरित्या पसरत आहे. तो रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून रविवारी (दि. २३) नव्याने टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 01:49 pm
कोविड रोखण्यासाठी पुन्हा टास्क फोर्स

कोविड रोखण्यासाठी पुन्हा टास्क फोर्स

दिवसेंदिवस वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, डॉ. सुभाष साळुंखे प्रमुखपदी

#मुंबई

देशात कोविड १९ या जिवघेण्या आजाराचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या  प्रमाणावर वाढत आहेत. राज्यातही या आजाराचा संसर्ग लक्षणीयरित्या पसरत आहे. तो रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून रविवारी (दि. २३) नव्याने टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

या टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. जुन्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्या टास्क फोर्समध्ये स्थान देण्यात आलेले नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने जुन्या सदस्यांना नव्या टास्क फोर्सबाबत काहीच कळवलं नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची सदस्यपदी बोळवण करण्यात आली आहे. शिवाय, यामध्ये क्लिनिकल डॉक्टरांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नव्या टास्क फोर्ससमोर कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करण्याबरोबरच चांगल्या लोकांचा समावेश न केल्याबद्दल टीका-टिपण्णींना सामोरे जाण्याचेही आव्हान असणार आहे.

कोविड १९ हा कोरोना नामक विषाणूमुळे पसरतो. या विषाणूच्या नव्यनव्या व्हेरियंटमुळे आधीच आरोग्यव्यवस्था जेरीस आलेली आहे. नवीन टास्क फोर्स हा कोविडच्या प्रादुर्भावाचे अभ्यासात्मक विश्लेषण करून त्यावर उपाययोजना सुचवण्याचे तसेच त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. गंभीर आणि अतिगंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयाचे आणि उपचाराचे व्यवस्थापन करणे, अतिगंभीर रुग्णांच्या काळजीसाठी तज्ञ डॉक्टर, आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य औषधांची शिफारस करणे ही कामे नव्या टास्क फोर्सला करावी लागणार आहेत.

कोविडने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना देशात तसेच राज्यात हा:हाकार माजला होता. या संकटावर मात करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली होती, पण आरोग्य विभागाला तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची गरज होती. अशा वेळी एप्रिल २०२० मध्ये पहिले टास्क फोर्स स्थापन करण्यात आले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक होते, तर त्यांच्यासोबत सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम तयार झाली. हे टास्क फोर्स कोविडच्या प्रादुर्भावाचे अभ्यासात्मक विश्लेषण करून त्यावर उपाययोजना सुचवल्या. तसेच त्यावर मार्गदर्शनदेखील केले. टास्क फोर्सने केलेल्या शिफारशींचा अहवाल शासनास कळवण्यात येतो. हे अहवाल सरकारला अनेक बाबतीत उपयोगी ठरतात.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest