संग्रहित छायाचित्र
सरोगसीद्वारे जन्माला येणारे मूल इछुक जोडप्याशी आनुवंशिकदृष्ट्या (जेनेटिकली) संबंधित असले पाहिजे, असे नाही हे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे. एस. भाटिया यांनी निकाल दिला.
दुसऱ्या अशाच प्रकारच्या घटनेत मूल सरोगेट आईसोबत आनुवंशिकदृष्ट्या (जेनेटिकली) संबंधित असलेच पाहिजे असेही नाही, असे मत न्यायमूर्तींनी मांडले. सरोगेट माता ही इच्छुक जोडप्याच्या रक्तसंबंधातील असायला हवी, असेसुद्धा नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. यामुळे इच्छुक जोडप्यांना सरोगसीद्वारे मूल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरोगसी कायद्यातील 'परोपकार किंवा निःस्वार्थ भावना' या शब्दांचे महत्त्व लक्षात घेऊन न्यायाधीशांनी हा निकाल दिला आहे. सरोगसीद्वारे जन्माला येणाऱ्या मुलाचे पालकत्व आणि ताबा इच्छुक जोडप्याचा असेल. सरोगसी प्रक्रियेद्वारे मूल व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या दोन वेगवेगळ्या जोडप्यांनी याबाबत ॲड. असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जदारांच्या वकिलांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत असा युक्तिवाद केला की, सरोगसी कायद्यानुसार, आनुवंशिकदृष्ट्या संबंधित’ या शब्दांचा अर्थ सरोगसीद्वारे जन्माला येणारे मूल आनुवंशिकदृष्ट्या इच्छुक जोडप्याशी संबंधित असले पाहिजे इतकाच आहे. परंतु, असा अन्वयार्थ न काढल्यास आणि सरोगेट आई इच्छुक जोडप्याशी आनुवंशिकरीत्या संबंधित असावी असे संबोधले गेले तर आनुवंशिकदृष्ट्या संबंधित’ या शब्दांना काहीच अर्थ उरणार नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्ट नमूद केल्याचे कोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आले. हे न्यायालयीन प्रकरण चालविणाऱ्या श्रीया आवले यांनी सांगितले की, सरोगसी कायदा हा न्यायिक चार भिंतींच्या आत समजून घेण्यासाठी तसेच हा कायदा अधिक स्पष्ट होण्यासाठी अजूनही कायद्यात स्पष्टता आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सरोगसी प्रक्रियेतून जन्माला आलेले मूल इच्छुक जोडप्याचे जैविक मूल मानले जाईल. तसेच नैसर्गिकरित्या जन्माला येणाऱ्या मुलांना कायद्यानुसार जे अधिकार आहेत, त्याचप्रमाणे सरोगेट मुलांनाही समान अधिकार प्राप्त होतील. सरोगसी कायद्यानुसार यापुढे आता कायद्याची प्रक्रिया विविध न्यायालयात अधिक प्रभावीपणे समजून घेता येईल. सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर करायचा असलेल्या जोडप्यांना हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे असे अर्जदार जोडप्याचे वकील ॲॅड. असीम सरोदे म्हणाले.
सरोगसीद्वारे मूल हवे असेल तर सरोगसी कायद्यानुसार काही अटींची पूर्तता आवश्यक आहे. सरोगसी हवी असलेल्या जोडप्याने त्यांच्या न्यायक्षेत्रातील प्रथमवर्ग न्यायालय किंवा त्यापुढील न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानुसार हा अर्ज करण्यात आला होता. जे मूल जन्माला येणार आहे त्याचा ताबा कोणाकडे असेल, याचा गर्भधारणेच्या आधीच न्यायालयाकडून स्पष्ट आदेश घेणे गरजेचे आहे. यातून मूल जन्माला आल्यावर कायदेशीर गुंतागुंत टाळता येते.
- ॲड. असीम सरोदे