Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यासाठी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 4 May 2023
  • 04:20 am
सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर

सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर

नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक, ‘केंद्रात ताई, राज्यात दादा’ फाॅर्म्युल्यावरही चर्चा

#मुंबई 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यासाठी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे.  

राष्ट्रवादी काॅंग्रेसचा  नवा अध्यक्ष कोण, यावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी नेमलेल्या समितीची मुंबईत बैठक झाली. यावेळी पक्षाचे सर्व नेतेदेखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा झाली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.  या बैठकीला राष्ट्रवादी सगळेच नेते हजर होते. यात ‘केंद्रात ताई, राज्यात दादा’ फाॅर्म्युल्यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत संमिश्र कल दिसून आला. काहींना हा फाॅर्म्युला  मान्य आहे, तर काहींनी आम्हाला अध्यक्षपदी शरद पवार हेच हवे, अशी ठाम भूमिका घेतली.

या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले, ‘‘पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला आहे. देशभरात कार्यकर्ते हे त्यांच्या नावामुळे जोडले आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येणार नाही. आम्ही आज सांगतोय, त्यांनी ही निर्णय बदलावा. आमचा पहिला प्रयत्न आहे की, पवार साहेबांनी अध्यक्ष राहावं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनीच राहावं अशी कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी आहे.’’

‘‘अध्यक्ष पदावर पवारांनीच कायम राहावं, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पर्यायी नावाचा विचार करणेही योग्य नाही. पक्षाचा जो निर्णय राहील, तो सर्वांनाच मान्य असेल.. सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा ही पुढचा पर्याय होऊ शकते. तो पर्याय राखून ठेवला आहे. मात्र, पवार साहेबांनीच अध्यक्षपदी राहावं अशी सर्वांची आग्रही मागणी आहे,’’ असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केंद्रात लक्ष घालावं आणि अजित पवार यांनी राज्यात लक्ष घालावं असं ठरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तसा फॉर्म्युला दिला आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. केंद्रात ताई आणि राज्यात दादा हा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जमलेले कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि शरद पवार यांच्याच नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे. इतर नेतृत्व नकोच, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार यांना आम्ही निर्णय बदलण्यास भाग पाडू, असंही त्यांनी म्हटलं आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest