पालघरमध्ये एसटी उलटली; तीव्र चढावावर बसची दमछाक, रिव्हर्स येताना एसटी उलटली, सहा विद्यार्थिनी जखमी

ब्राम्हणगाव ते आमगाव या मार्गावरून शाळकरी विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसगाडीला गुरुवारी सकाळी साडेच्या सुमारास अपघात झाला.

Bus Accident

पालघरमध्ये एसटी उलटली; तीव्र चढावावर बसची दमछाक, रिव्हर्स येताना एसटी उलटली, सहा विद्यार्थिनी जखमी

वाडा : ब्राम्हणगाव ते आमगाव या मार्गावरून शाळकरी विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसगाडीला गुरुवारी सकाळी साडेच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थिंनी असून खुशबू मानकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसह अन्य चार ते पाच विद्यार्थिनी यात किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुदैवाने यात जीवितहानी टळली असून सर्व विद्यार्थिनींना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ब्राम्हणगाव, कुमदल, रायसल, आमगाव या भागातील जवळपास ७० विद्यार्थिनींना अंभई येथील हायस्कूलमध्ये घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नुकतीच पालकांच्या मागणीवरून सुरू करण्यात आली होती. आज गुरुवारी जवळपास ५० विद्यार्थिनींना बस घेऊन जात असताना एका तीव्र चढावावर बसची दमछाक झाली. मागे येताना प्रसंगावधान राखून बसमधील अनेक विद्यार्थिनींना खाली उतरवण्यात वाहकाला यश आले. मात्र तरीही उर्वरित विद्यार्थिनींसह काहीच क्षणात बस रस्त्याच्या कडेला उतरून पलटली.

बसमधील खुशबू मानकर या विद्यार्थिनीला दुखापत झाली असून अन्य काही विद्यार्थिनींना किरकोळ इजा पोहोचली. अचानक घडलेल्या या प्रकाराने पाचवी ते दहावीच्या वयोगटातील या विद्यार्थिनी भयभीत झाल्या असून सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा नादुरुस्त बस या मार्गावर पाठविल्या जात असून शाळेने देखील चांगल्या बस पाठवण्याचे लेखी पत्र वाडा आगार व्यवस्थापकांना दिल्याचे सांगण्यात आले. आगार व्यवस्थापक तुळशीराम गांगुर्डे इतकी मोठी घटना घडूनही बेपत्ता असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.  चालक उमेश वलटे याला वाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्यात आले आहेत. एसटी प्रशासनानेही जखमींना तातडीची किरकोळ मदत केली असून या अपघात प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. औपचारिक कार्यवाहीने तालुक्यातील अतिशय भंगार बसगाड्यांना लागलेले हे ग्रहण दूर होईल का? असा सवाल उपस्थित केला जात असून याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी मागणी केली जात आहे. वाडा आगारातील काही चालकांनी दिलेल्या माहितीनुसार देखभाल - दुरुस्ती विभाग अतिशय कुचकामी असून कामचोर भूमिकेमुळे अनेकदा नादुरुस्त गाड्या आमच्या हाती दिल्या जातात. व्यवस्थापन विभागात १० ते १५ वर्षांपासून तेच कर्मचारी जागा अडवून कार्यरत असून वाडा आगारातील अनागोंदी थांबविण्यासाठी नवीन कर्मचारी वर्ग भरणे गरजेचे आहे, असे कर्मचाऱ्यांना वाटते. नादुरुस्त गाड्यांचा फटका विद्यार्थी व प्रवाशांना सोसावा लागतं असून वरिष्ठ पातळीवर या घटनेची दखल घेणे गरजेचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest