संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दीपक साळुंखे यांच्यावर सध्या राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचेही त्यांनी राजीनामे दिले आहेत. दीपक साळुंखे यांनी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाने महायुतीलाही धक्का बसला आहे.
दीपक साळुंखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने सांगोल्यातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शहाजी पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण विधानसभेसाठी सांगोल्यातून दीपक साळुंखे हे इच्छुक आहेत. त्यामुळे दीपक साळुंखे यांच्या निर्णयाचा शहाजी पाटील यांना फटका बसू शकतो. सांगोल्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दीपक साळुंखे यांची ओळख होती. मात्र नंतरच्या काळात दीपक साळुंखे यांनी अजित पवार यांची साथ दिली. दीपक साळुंखे हे महायुतीतून निवडणूक लढवण्यास तयारी केली आहे. मात्र सांगोला येथील विद्यमान आमदार शहाजी पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे ही जागा येत्या काळात शिवसेनेच्या वाट्याला जाईल, अशी शक्यता आहे. असे असताना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी साळुंखे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला. आणि आता थेट आपण जनता हाच पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. दीपक साळुंखे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करत असताना शेकाप आणि आमदार शहाजी पाटील यांनी आपल्याला साथ आणि संधी द्यावी असे आवाहनही केले आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होत असतानाच आता दीपक साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट महायुतीला आणि अजित पवार यांना धक्का दिला आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या निमित्ताने राज्यातील पहिली बंडखोरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून पुढे येताना दिसत आहे.
दीपक साळुंखे यांच्यापुढील राजकीय पर्याय
दीपक साळुंखे आता जनतेच्या जिवावर पुढे येत आहेत, असे जरी जाहीर केले असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाची ऑफर दीपक साळुंखे यांच्याकडे येत असल्याची माहिती आहे. मात्र येत्या काळात दीपक साळुंखे कुठली भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.