शिवसेना भवन ठाकरे गटाचेच
#नवी दिल्ली
शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदेंचे? शिवसेनेच्या शाखांवर मालकी कोणाची? शिवसेनेच्या निधीवर हक्क कोणाचा, या प्रश्नांचा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) सोक्षमोक्ष लावताना हे सर्व पूर्वीप्रमाणे ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबईस्थित वकील अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह यांची मालकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर शिवसेना भवनासह शाखा तसेच या पक्षाचा निधी आणि इतर संपत्ती या गोष्टींवरदेखील शिंदे गटाची मालकी असावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्याचबरोबर शिवसेना भवन, इतर शाखा आणि पक्षाचा निधी आणि इतर संपत्ती उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे सांगितले.
मागील वर्षी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. आधी १५ आणि नंतर ४० आमदार सोबत घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपच्या पाठिंब्यावर नवे सरकार स्थापन केले. केंद्रातील भाजप नेतृत्वाने शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. कालांतराने निवडणूक आयोगाने शिवसेना या नावाची तसेच चिन्हाची मालकीही त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिला. हा निर्णय आल्यानंतर शिवसेना भवन आणि इतर शाखांवर शिंदे गट मालकीदा दावा करणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, त्याच वेळी ‘‘आम्ही शिवसेना भवन, इतर शाखा आणि पक्षाच्या निधीवर दावा सांगणार नाही,’’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या विषयावरील चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, इतर शाखा आणि पक्षाचा निधीचा ताबादेखील शिंदे गटाकडेच देण्यात यावा, अशी मागणी त्या याचिकेत करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने अॅड. आशिष गिरी यांनी यांना चांगलेच फटकारले. ‘‘शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्तीचा ताबा एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण,’’ असा सवाल करीत असा थेट सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्याला निरूत्तर केले. ही याचिका फेटाळल्याने अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला. शिवसेना भवन, इतर शाखा तसेच पक्षाचा निधी आणि इतर संपत्ती यावर उद्धव ठाकरे यांचाच ताबा राहणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनाशिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. हे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही केला होता. यासंदर्भातील कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे दोन्ही गटाने दिली होती. मात्र, ‘‘शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे लोकशाहीविरोधी प्रथा परत आणल्या. पक्षाला खासगी जागेवर आणले. गटनेतेपदी अजय चौधरींची बेकायदेशीर निवड केली,’’ अशी कारणे सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येत्या काही दिवसांत १६ आमदारांच्या अपात्रतेवरील प्रकरणासह निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दिलेल्या तक्रारीचा निकाल लागण्याचीही दाट शक्यता आहे.
वृत्तसंस्था