Sharad Pawar : शरद पवारांनी ‘सहकाऱ्यां’ना फटकारले

गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाच्या घडामोडीत गुंतलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी काहीसे आक्रमक होत शिवसेना आणि काॅंग्रेस या महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या नेत्यांना फटकारले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 01:02 am
शरद पवारांनी ‘सहकाऱ्यां’ना फटकारले

शरद पवारांनी ‘सहकाऱ्यां’ना फटकारले

म्हणाले, संजय राऊतांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो; पृथ्वीराज चव्हाणांनी आपली कॅटेगरी चेक करावी

#सातारा

गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाच्या घडामोडीत गुंतलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी काहीसे आक्रमक होत शिवसेना आणि काॅंग्रेस या महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या नेत्यांना फटकारले.

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड आग्रहामुळे तो मागे घेतला. राष्ट्रवादीतील या घडामोडीवर ‘सामना’तून भाष्य करताना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले या वृत्तपत्राचे संपादक खासदार संयज राऊत यांनी ‘‘शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले,’’ अशी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ‘‘संजय राऊत यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय केले, त्यांना माहिती नाही.’’ माजी मुख्यमंत्री असलेले काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर ‘ पृथ्वीराज चव्हाणांनी आधी त्यांच्या पक्षातील स्वत:ची कॅटेगरी चेक करावी,’ अशा आशयाचे तिखट प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. ‘‘आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही, हा आमच्या घरातील 

प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही, तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो,’’ अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना फटकारले.

शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा थेट हल्ला प्रथमच ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला होता. शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचे म्हटले होते. यावर बोलताना १९९९ मध्ये मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, देशमुख, अशा अनेक जणांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. या सर्वांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली होती, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. ‘‘राष्ट्रवादीतील घडामोडींचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. 

आमच्यात काही गैरसमज नाही,’’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

‘‘पृथ्वीराज चव्हाणांचे त्यांच्या पक्षात काय स्थान आहे? ते A आहेत की B, हे पहिल्यांदा चेक करावे. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना विचारले की त्यांची कॅटेगिरी काय तर ते जाहीरपणे नाही, पण खासगीत त्यांची कॅटेगिरी काय हे सांगू शकतील,’’ असा 

खोचक टोला शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.

 कर्नाटकात आम्ही जे उमेदवार दिले त्यात आम्ही सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात विस्तारित पाऊल टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काँग्रेस किंवा मित्रपक्षांसोबत आम्ही कर्नाटकात बोललो नाही. कारण आम्हाला शून्यापासून सुरुवात करायची होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना मदतीची गरज

गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाहणी करण्यासाठी कुणीच पोहचले नाही, तर काही ठिकाणी पंचनामे झाले असले तरी शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. पक्ष सोडून शेतकऱ्यांना मदत करायला हवी. या सरकारची लोकांना मदत करण्याची भूमिका नाही, जनतेसमोर जाण्याची भूमिका सरकारची नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest