संग्रहित छायाचित्र
मुंबई: सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या खोत यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती. ‘‘शरद पवार यांनी आपली महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. आता त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे काय,’’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे नव्याने चर्चा रंगली आहे.
पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. जळगावमध्ये आयोजित प्रचारसभेत हा छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी शिंदे यांनी रयत क्रांती संघटनेला सोडचिठ्ठी दिल्याचे कारणही सांगितले. ‘‘सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खोत सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेले आहेत. त्यांची कामे व्यक्तीकेंद्रित झाली आहेत,’’ असे ते म्हणाले.
खोतांवर पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचा दावा
पांडुरंग शिंदे यांनी यावेळी सदाभाऊ खोत यांच्या धोरणांवर पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचाही दावा केला आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील मोठे २५ कार्यकर्ते आहेत. ते ही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सदाभाऊ खोत यांना मोठा झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खोत नेमके काय म्हणाले होते?
सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत शरद पवारांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ते म्हणाले होते, ‘‘देवेंद्र फडणवीस यांनी गायीचे सर्व दूध तिच्या वासरांनाच देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शरद पवारांना नववा महिना लागून त्यांना कळा सुटल्या. त्यांना आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांचे काय होणार? असा प्रश्न पडला. पवार व त्यांच्या चिल्ल्या-पिल्ल्यांनी कारखाने, बँका व सूतगिरण्या लाटल्या. एवढे करूनही ते आता महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची इच्छा असल्याचे म्हणतात. कसला चेहरा तुझा? महाराष्ट्र तुला तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’’
खोत यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला होता. इतरही अनेक नेत्यांनी खोत यांच्या विधानाचा निषेध केला होता.