Sharad Pawar : शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (दि. २) करताच राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादीत दुसऱ्या क्रमांकाचे नेते कथितरित्या बंड करण्याच्या तयारीत असून त्यांना स्वपक्षातील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा जोरात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 02:13 pm
शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा, अजित पवारांच्या कथित बंडाच्या शक्यतेची हवा घेतली काढून

#मुंबई 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (दि. २) करताच राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादीत दुसऱ्या क्रमांकाचे नेते कथितरित्या बंड करण्याच्या तयारीत असून त्यांना स्वपक्षातील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीचे संपूर्ण पदाधिकारी, आमदार-खासदार, कार्यकर्ते यांनी ‘साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा. आम्ही त्यांच्याशिवाय पक्षाची कल्पना करू शकत नाही,’ अशा आशयाची सामूहिक भूमिका घेतली. हे चित्र समोर आल्यावर अजित पवार यांच्या कथित बंडाच्या शक्यतेची हवा शरद पवार यांनी काढून घेतल्याची चर्चा आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्याचबरोबर यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. अजित पवार कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करत होते. मात्र, नेते आणि कार्यकर्त्यांच्या या आग्रही भूमिकेचा विचार करून शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ‘‘कुठे थांबायचं हे मला कळतं. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काहीजणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, नरहरी झिरवळ आदी असतील. राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, असा अध्यक्ष निवडावा.’’

शरद पवार कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. काही कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार-शरद पवार’ अशी घोषणाबाजी सुरू केली.  ‘‘आपण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहोत. ही सार्वजनिक निवृत्ती नाही, गेली सहा दशके मी जनसामान्यांसाठी जे काम करत आहे, त्या सेवेत आताही खंड पडू देणार नाही. विकास, शेती अशा काही क्षेत्रांसाठी आता अधिक वेळ देईल,’’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच दिले होते संकेत, पण...

शरद पवारांनी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाकरी फिरवण्याचे विधान करून याचे संकेत दिले होते. त्यावेळी ‘राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून जबाबदारी काढून ती इतरांना दिली जाईल,’ असा त्याचा अर्थ बहुतेकांनी काढला होता. पवार स्वत:च निवृत्तीची घोषणा करतील, अशी चर्चा नव्हती. यामुळे पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांना धक्का बसला.

निर्णय मागे घ्यावा, यासाठी सर्व मोठ्या नेत्यांचे साकडे

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. मात्र, याला पक्षातून प्रचंड विरोध होत आहे. याची दखल घेत ‘‘शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत समिती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल,’’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते शरद पवारांच्या मनधरणीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्यांनी जेवण करून सावलीत बसावे, असा शरद पवार यांचा निरोप सुप्रिया सुळे यांनी दिला.

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मनधरणी त्यांना करणार आहोत. आता त्यांच्याकडेच भेटायला निघालो आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले. त्यांचा निर्णय आमच्यासाठी धक्का असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

भाकरी फिरवण्यामागील जबरदस्त खेळी

शरद पवार आपल्या अशाच धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील त्यांची ताकद कमी होऊन अजित पवारांचा दबदबा वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमांमुळे शरद पवार काहीसे नाराज होते. यामुळेच त्यांनी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. ‘‘भाकरी वेळीच फिरवली पाहिजे. त्यात उशीर झाला तर करपू शकते. पक्षात आता ही वेळ आली आहे,’’ असे ते म्हणाले होते.

अजित पवार यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाला अडचणीत आणणारी कृती केली. २०१९ मध्ये त्यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा ते भाजपसोबत जाण्याची चर्चा जोरात आहे. अजित पवार यांनी जाहीरपणे ‘‘मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’’ असे स्पष्ट केल्यानंतरही ही चर्चा थांबलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार ही दोन शक्तिस्थाने निर्माण झाली होती. गेल्या काही महिन्यांत हे अधिक ठळकपणे दिसून येत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून मास्टरस्ट्रोक लगावला आहे. गत काही दिवसांपासून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत बंडखोरी करून भाजपसोबत जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. यावर शरद पवारांनी आपली रोखठोक भूमिका मांडताना ‘‘हा निर्णय वैयक्तिक असू शकतो, पण राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही,’’ असे कुणाचेही नाव न घेता ठामपणे सुनावले होते.  

अजित पवारांच्या कथित संभाव्य बंडखोरीच्या बातम्यांमुळे पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला होता. शरद पवारांनी आता अचानक अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून पक्षात पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. आता सामान्य कार्यकर्त्यांपासून आमदार-खासदार, पदाधिकारी सर्वच जण शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी करताना दिसत आहे. शरद पवारांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे संपूर्ण राष्ट्रवादी एका नेतृत्वाखाली एकत्र आल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.  

लोकशाही जगते की नाही माहिती नाही. जाती-जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. आपण पुढच्या पिढीला काय देणार, अशी अवस्था आहे. अशात शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा धक्का लोकांना पचणारा नाही. त्यांनी राजीनामा परत घ्यावा. तुम्ही तुमच्यासारखे पर्यायी नेतृत्व तयार करून राजीनामा द्यावा.

- सरोज पाटील, शरद पवार यांची बहीण

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest