Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत ‘‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं,’’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी पुस्तकात नमूद केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 02:18 pm
पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना : शरद पवार

पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत ‘‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं,’’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी पुस्तकात नमूद केले आहे.

'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या आवृत्तीत अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार म्हणतात, ‘‘२०१९ मध्ये राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. महाविकास आघाडीचा सरकार स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. ‘राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहोचले असून, अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,’ अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता.’’

‘‘महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक-दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं की, हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं,’’ असा दावा शरद पवार यांनी पुस्तकात केला आहे.

‘‘महाविकास आघाडी' चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं,’’ असेही पवार यांनी नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest