Baba Siddiqui Murder : सिद्दीकी हत्येनंतर मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याने देशभर खळबळ माजली असून राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची निवासस्थाने, महत्त्वाच्या चौकातील सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.

Baba Siddiqui Murder

Baba Siddiqui Murder : सिद्दीकी हत्येनंतर मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

वाय दर्जाची सुरक्षा असतानाही झालेल्या हत्येने राजकारण्यांमध्ये भीतीचे वातावरण, बिश्नोई गँगवर हत्येचा संशय

#मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याने देशभर खळबळ माजली असून राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची निवासस्थाने, महत्त्वाच्या चौकातील सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. कुख्यात बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. (Baba Siddiqui Murder)      

बाबा सिद्दीकी (वय ६६) यांना धमकी आल्यामुळे वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे ही धमकी आली होती. वाय दर्जाची सुरक्षा असतानाही शनिवारी रात्री वांद्रे पूर्वमध्ये सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली. हरयाणातील गुरमैत सिंह आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप अशी त्यांची नावे असून दोघेही २० वर्षांचे आहेत. हे दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती हाती आली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. तो पनवेल स्थानकावरून राज्याबाहेर गेल्याचा अंदाज आहे. तिसऱ्या आरोपीचे नाव शिवकुमार उर्फ शिव गौतम असे असून तो उत्तर प्रदेशातील बेहराईच जिल्ह्यातील गंधारा गावाचा होता. तो काही काळ पुण्यात नोकरीही करत असल्याचे समजते. 

हत्येपूर्वी आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हे आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते.

दसऱ्याला खेरवाडी, वांद्रे सिग्नल येथे देवींच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. त्यामुळे तेथे गर्दी असते. सिद्दीका यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे. त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी बाबा सिद्दीकी पायी निघाले होते. यावेळी रात्री ९.३० वाजता ९.९ एमएम पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले. यावेळी सिद्दीकी यांच्या गाडीलाही काही गोळ्या लागल्या. त्यामुळे तीनहून अधिक गोळ्या झाडल्याचा अंदाज आहे. 

लिलावती रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार रात्री साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने रात्री  ११.२५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकींना दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून  गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 

सलमानची जवळीक नडली?

बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यावसायिक होते. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते. त्यामुळे सलमान खान याच्याही घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. तरीही त्यांची हत्या झाली. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हत्यारं पुरवण्यात आली होती.

मलबार हिलवर कडक बंदोबस्त 

सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री, मलबार हिलवरील मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरील व्यवस्था वाढवली आहे. तसेच महत्त्वाच्या नाक्यावरील सुरक्षाही वाढवली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासमवेत आहेत. या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसते. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे.

काँग्रेस नेते, राहुल गांधी

राज्याची कोलमडलेली कायदा-सुव्यवस्था स्थिती चिंता वाढवणारी आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पदावरून पायउतार होण्याची गरज आहे.

ज्येष्ठ नेते, शरद पवार.

मला असं वाटतं की, त्यांना (शरद पवार) केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. 

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री,  देवेंद्र फडणवीस

बाबा सिद्दीकी यांची हत्या म्हणजे काँट्रॅक्ट किलिंग आहे. बाबा सिद्दीकी हे माझे राजकीय सहकारी होते. तसेच ते उद्योजकही होते.  सिनेकलावंत सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तेव्हा मी आणि बाबा सिद्दीकी शेजारी बसलो होतो. बाबा सिद्दीकींना धमक्या आल्यावर वाय सुरक्षा दिल्यानंतर पोलिसांचं काम संपलं का? कर्तव्य संपलं का? पोलिसांचं काम होते की धमकी कुठून आली, कशी आली त्याचा शोध घेणं. ही बाब महत्त्वाची होती. हत्येमागचा कर्ताकरविता कुणीतरी वेगळा आहे. जे, कुणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. जे घडलं त्यात फक्त गृहमंत्र्यांची जबादारी नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही जबाबदारी आहे.

ज्येष्ठ मंत्री, छगन भुजबळ 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest