सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच : ॲड. निकम
#नाशिक
सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी हा निकाल लागायला हवा. यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागेल, असे मत ज्येष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकाम यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली. तब्बल ९ महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याची उत्सुकता फक्त राज्यालाच नाही तर देशाला लागली आहे. या सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देऊ शकते, या संदर्भात चर्चा, अंदाज बांधणे सुरू आहे. याबाबत ॲड. उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल नक्की केव्हा लागेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु माझ्या मते, सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी हा निकाल लागायला हवा. यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागेल.’’
सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला, तर कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली. राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शहा येत्या १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मे पूर्वी हा निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.