वेदांता फॉक्सकॉनबाबत श्वेतपत्रिका : उदय सामंत
#मुंबई
महाराष्ट्रात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण असतानाच राज्य सरकारने वेदांता फॉक्सकॉनसह आपल्यावर आरोप झालेल्या विषयांवर स्पष्टीकरण देण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. २५) याबाबत घोषणा केली. राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न तसेच नागरिकांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता असणारा वेदांता फाॅक्सकाॅन हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या विषयावर आठ दिवसात श्वेतपत्रिका काढणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनता शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दावा सामंत यांनी केला. ‘‘सरकार स्थापन झाल्यापासून नऊ महिन्यांच्या कार्यकाळात आम्ही एकही नियमबाह्य काम केले नाही, भविष्यातही करणार नाही. वेदांता फॉक्सकाॅनसह ज्या ज्या विषयावर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका पुढील आठ दिवसात काढणार आहे. दावोसला १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे जे करार झाले, त्याचे काम सुरू झाले आहे. भविष्यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेल्याशिवाय शांत बसणार नाही.’’
‘‘सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पासाठी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. आता हेच लोक विरोध करत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसात वेदांता फॉक्सकॉनसह ज्या-ज्या विषयांवर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका राज्य सरकारकडून पुढील आठ दिवसांत काढण्यात येईल,’’ असे उदय सामंत यांनी जाहीर केले.
उदय सामंत म्हणाले, ‘‘रिफायनरीच्या कामात राजकारण केले जात असून जालियनवाला बाग प्रकरणासोबत त्याची तुलना केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसूमध्ये १३०० एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे पत्र लिहिले होते. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, राज्याचा जीडीपी वाढणार, असे या पत्रात म्हटले होते. याबाबतचे ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.’’ वृत्तसंस्था