राहुल गांधींनी घ्यावेत शिंदेंकडून धडे
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्तुती करण्यात आली आहे. वीर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारण आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख शिंदेंच्या पुस्तकात आहे. यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींनी सुशीलकुमार शिंदेंकडून काहीतरी शिकले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
'फाईव्ह डीकेड्स इन पॉलिटिक्स' असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, माझ्या मनात वीर सावरकर यांच्याविषयी सन्मान आहे. त्यामुळेच १९८३ मध्ये नागपूरमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थित होते. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातून येतो. त्यामुळे वीर सावरकरांनी जे प्रयत्न केले त्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. वीर सावरकरांचं हिंदुत्व या विषयावर जोर दिला जातो. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू होते. तसेच वीर सावरकर विज्ञानवादी होते, असेही सुशीलकुमार शिंदेंचे यांनी नमूद केले आहे. हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात वीर सावरकर यांच्याबाबत आदरपूर्वक उल्लेख आहे.
वीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसची भूमिका ही कायमच त्यांच्यावर टीका करण्याची आहे हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य मेरा नाम राहुल गांधी है, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, इसलिये मैं माफी नहीं मांगूंगा, अजूनही देशाच्या स्मरणात आहे. काँग्रेसची भूमिका सावरकर विरोधी आहे यात काही शंकाच नाही. मात्र आता सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांची स्तुती असणे आणि पक्षाची भूमिका विरोधी असणे यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुस्तकातल्या या उल्लेखावरून राहुल गांधींना सल्ला दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पहिल्यांदाच काँग्रेस पक्षातल्या नेत्याने त्यांची स्तुती केली आहे. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राहुल गांधी यांनी यातून शिकवण घेतली पाहिजे. राहुल गांधींना सुशीलकुमार शिंदेंनी भेटले पाहिजे. जो अभ्यास शिंदेंनी केला आहे तो त्यांनी राहुल गांधींना करायला सांगितला पाहिजे. राहुल गांधींना विचारसरणी बदलण्याचा सल्ला सुशीलकुमार शिंदेंनी दिला पाहिजे. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी वीर सावरकर यांचा त्यांनी अपमान केला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे.