संग्रहित छायाचित्र
गोंदिया: लोकनियुक्त सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवता असते. ते सरकारचे विहित कर्तव्यच असते. मात्र ज्या नेत्यांना सरकारची, विधानसभेची माहिती नाही. त्यांना राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती कशी कळणार, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
शनिवारी (२८ सप्टेंबर) अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत. तसेच राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर ते चुकीचे आहे. महिलांना अशाप्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अजित पवार गटाचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पटेल यांनी आज (दि. ३०) गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. या दरम्यान त्यांना राज ठाकरेंच्या टीकेबाबतही विचारण्यात आले, या संदर्भात बोलताना, ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर आहे का? असा सवाल उपस्थित केला.
लाडकी बहीण योजना असो, गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय असो किंवा मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय असो, या आणि इतर अशा अनेक कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. अजित पवार यांच्यासारखा संयमी अर्थमंत्री आपल्या राज्याला लाभला आहे. त्यांना पैसा कसा वाचवायचा याची माहिती आहे. त्यामुळे एकदा अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर त्याबाबत शंका उपस्थित करणे योग्य नाही. पुढची पाच वर्षसुद्धा या योजना चालणार आहेत. इतक नाही, तर या योजनांतर्गत दिले जाणारे अर्थसाहाय्यदेखील वाढणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य
पुढे बोलताना त्यांनी महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य केले. महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झालेले आहे. येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये जागा वाटपाबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तिन्ही पक्ष मिळून याबाबत सकारात्मक आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत, त्यासंबंधीसुद्धा विचार करण्यात आला आहे. जिथे जागांची अदलाबदल आवश्यक आहे, तिथे ती करण्यात येईल. तसेच कोण किती जागा लढणार? हा निर्णयसुद्धा लवकर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला १० ते १२ जागा मिळतील असे सर्व्हे सांगतो, असे रोहित पवार म्हणाले होते. याबाबत विचारले असता, रोहित पवारांनी म्हटले म्हणजे सर्व्हे खरा असतो का? त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. माझ्याकडेही महायुतीचा सर्व्हे आहे. त्यामध्ये महायुतीला १७५ जागा मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.