मुंबई महापालिकेत सत्ता, लोकसभेच्या ४५ जागा
#मुंबई
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी पक्षाच्या राज्यातील नेत्यांची बैठक घेत व्यूहरचना ठरवली असून येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात घेणे आणि लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरविण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत शहा यांनी माहिती घेतली.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या मुंबई कोअर कमिटीच्या दोन सविस्तर बैठका घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांना सांगितले. शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभा निवडणुकीत ४५ जागा महाराष्ट्रातून निवडून आणण्याबाबतच्या रणनीतीविषयी चर्चा केली.
या बैठकीला चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ‘‘बाबरी पडली त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काहीच योगदान नव्हते. बाबरी पडली तेव्हा तेथे एकही शिवसैनिक नव्हता,’’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून अमित शहा यांनी पाटील यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. त्यामुळे पाटील यांनी शहा यांच्यासमोर येण्याचे टाळले, असे समजते.
वृत्तसंस्था