लोक उष्माघाताने नव्हे चेंगराचेंगरीत मेले
#मुंबई
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. त्यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले. त्यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे मृत्यू झाले ते उष्माघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सोबतच त्यांनी या कार्यक्रमाचा एक व्हीडीओ देखील शेअर केला आहे. दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागले. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही नागरिकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून आता काँग्रेसने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वृत्तसंस्था