संग्रहित छायाचित्र
#इंदापूर : लोकांच्या मनात सध्य स्थितीमधील राजकारणाबद्दल चीड आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे परिवर्तन झाले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात आहे. महाराष्ट्रात चित्र बदलू शकते हे आपल्याला देशाला दाखवून द्यावे लागेल असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी हर्षवर्धन यांच्या भाजपामध्ये जाण्यावरही चिमटा काढला. हर्षवर्धन यांचा रस्ता चुकला होता. मात्र, गांधी-नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा रस्ता हाच आपला रस्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निर्णय घ्यायला उशीर झाला. मात्र, तो निर्णय त्यांनी घेतला याचा आनंद असल्याचे पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यात आणि इंदापूरमध्ये मलिदा गॅंग सक्रिय असल्याचे ते म्हणाले. हा बदल घडवण्यासाठी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, पुणे जिल्हा व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा माझा प्रयत्न होता. इंदापूरकडेही माझे लक्ष होते. इंदापूरचा आणि इंदापूरमधील कारखानदारीचा विकास याला प्रोत्साहन दिले. शंकररावभाऊ पाटील यांनी स्वच्छ चारित्र्याचं राजकारण केलं. अलीकडच्या काळात तालुक्याच्या राजकारणाला काहीजणांनी वेगळीच दिशा दिल्याचे ते म्हणाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. अनेक वर्ष मी प्रशासकीय कारभार पाहिलेला आहे. त्यामुळे अधिकारी अनेकदा वेदना माझ्याजवळ व्यक्त करतात. इंदापूरमधील नेतृत्वाची पोकळी हर्षवर्धन भरून काढतील. त्यांचा पक्ष प्रवेश उसाचा धंदा आणि राजकारणाला दिशा देणारा असेल. त्यांना तुम्ही विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना करीत पवार यांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी घोषित केली.
जयंत पाटील यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं विधान केले. ते म्हणाले, इंदापूरचा निकाल काय लागेल? हे आताच जाहीर झालं आहे. २०१९ साली आमचे नेते सोडून जात होते. अ,ब,क,ड गेला तरी चालेल. शरद पवार नावाचे विद्यापीठ आमच्याकडे आहे. दिल्ली पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न करते. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, असे दिल्लीला वाटते. हर्षवर्धन पाटील तुम्ही स्वगृही येत आहात. आधी आमच्याकडे गर्दी जास्त होती. ती आता कमी झाली. इंदापूरमध्ये विजय आवश्यक असल्याने आम्ही हर्षवर्धन पाटलांना आमंत्रित केलं आणि ते पक्षात आले.
सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. त्या चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही प्रत्यक्ष योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता. मी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, बोलणे व्हायचं, तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबला आहात, त्याऐवजी इकडे या. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. त्यानुसार आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरदचंद्र पवार) आलो आहे.
इंदापूरनंतर मिशन फलटण
शरद पवारांनी १४ ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याचे सूतोवाच दिले. ते म्हणाले, मी जास्त काही बोलत नाही. चित्र बदलतंय. आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळी आणखी कुठूनतरी फोन आला. त्यांनी हट्ट केला की इंदापूरला तुम्ही आले, १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी विचारलं काय कार्यक्रम आहे? तर ते म्हणाले, इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम आहे. मी विचारलं कुठे? तर ते म्हणाले फलटणला. समजलं का? त्यामुळे आता यानंतर फलटण. त्यानंतर पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत.