संग्रहित छायाचित्र
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे.
सद्यस्थितीत ९ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत झाले आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यात येत आहे व सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.
तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ‘‘३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे २५ वर्ष या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती व गृहसंकुलांनी सहभागी व्हावे,’’ असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये या योजनेत सहभागासाठी आतापर्यंत प्राप्त ४१ हजार ११५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात १८ हजार २४५ अर्ज मंजूर झाले असून यापैकी ३७९८ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये छतावरील आणखी ३६८२ सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.