सोलापूर : गेली चार टर्म विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षात विरोध होत असून भारतीय जनता पक्षातील ॲॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी उमेदवारी मागितली आहे. देशमुख उमेदवारीबाबत बिनधास्त असले तरी याचा निर्णय मुंबईत होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक म्हणून सांगलीचे मकरंद देशपांडे हे शुक्रवारी सोलापुरात दाखल झाले.
त्यांना सोलापूर विश्रामगृहात अनेक इच्छुक उमेदवार भेटले. या मतदारसंघातून गेली वीस वर्षे आमदार विजयकुमार देशमुख हे विधानसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. चार टर्म आमदार राहिल्याने त्यांच्याविषयी पक्षात नाराजी असून सर्वांनी मिळून आपले म्हणणे देशपांडे यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांना विरोध करत महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. थोबडे बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष असून सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी आहेत.
सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी, सुरेश पाटील यांच्यासह तालुका, इतर पदाधिकाऱ्यांनी देशमूख सोडून कोणीही उमेदवार देण्याची मागणी देशपांडे यांच्याकडे केली. यावेळी निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी सर्व महत्त्वाच्या नेते मंडळाची भेट घेतली. त्यांनी सर्वांना आपल्या पसंतीच्या प्रत्येकी तीन नावाची शिफारस करून ती नावे बंद पाकीटात मला द्यावी असे सांगितले. यातील तुमची जी काही मागणी असेल ती पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालतो, असे स्पष्ट केले. विजयकुमार देशमुख यांनी गेले वीस वर्ष नगरसेवकांमध्ये गटबाजी करून आपल्या स्वार्थ साधला.
त्यामुळे चिडलेल्या आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी देशमुखांना विरोध केला आहे. त्यांच्याविरोधात दुसरा उमेदवार देण्याची मागणी केली आहे . शेवटी उमेदवारी कोणाला द्यावयाची याचा निर्णय मुंबई येथील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत होऊन त्यात निवड केली जाणार आहे. आपल्याला विरोध होत असला तरी विजयकुमार देशमुख हे उमेदवारीबाबत निश्चित आहेत. कोणी कितीही विरोध केला तरी उमेदवारी आपणालाच मिळेल याची त्यांना खात्री वाटते. देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी मागणारे मिलिंद थोबडे हे केशर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य असून ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख मानकरी आहेत.
अनेक विविध संघटनेवर त्यांनी पदाधिकारी म्हमून काम केले आहे. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी अनेक फौजदारी गुन्हे चालवले आहेत. त्यांच्यामागे मोठा जनसेवेचा आधार असल्याने लिंगायत समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांची आर्थिक बाजू भक्कम असल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो, असे पक्षात बोलले जाते. त्यांच्या मातोश्री राजकारणात सक्रिय असून पत्नीही सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो, असे भाजप पदाधिकारी बोलत आहे.