#कर्जत-जामखेड : विधानसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही चांगलंच राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी (राम शिंदे) २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला असून माझी कॉपी करायला त्यांनी सुरुवात केल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी नाव न घेता केली आहे. यानंतर राम शिंदे यांनीही माझ्या पेहरावावर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्षे काय केलं ते सांगा? असा टोला दिला आहे.
राज्यातील अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. एकीकडे महायुती नेत्यांच्या सभा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा का होतो?, हे मला माहिती नाही. आता तर कहरच झाला. मी युवा आहे, पण काहींनी आता २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला आहे. त्या सल्लागाराला बजावले आहे की, रोहित पवारांना कॉपी करायचं. समाजकारण आणि राजकारणात काम करत असताना माझ्या डोक्याचे केस पांढरे झाले, तरीही मी ते काळे करत नाही. मात्र, २० लाख रुपये देऊन त्यांनी (राम शिंदे) नेमलेल्या सल्लागाराने त्यांना सांगितलं की तुम्हाला युवा दिसावं लागेल. मग काय तुमचे केस पाढंरे झालेत ते काळे करा. मग त्यांनी काळे केले. तुम्ही आता युवकांसारखे कपडे घालायला सुरुवात करा. मग त्यांनी कपडे घालायला सुरुवात केली. आपण एक राखी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर त्यांनीही लगेच कार्यक्रम घेतला. आता मला हे कळत नाही, जे आपण करत आहोत, तेच जर करायचे असेल सल्लागार कशाला नेमला?
यावर राम शिंदे टोला लगावताना म्हणतात, मला वाटतं विरोधकांना मतदारसंघातील सर्व प्रश्न कळून चुकले आहेत. त्यामुळे ते आता माझ्या पेहरावावर बोलायला लागले आहेत. मी एक ग्रामीण भागातील व्यक्ती आहे. विरोधकांना माझ्या पेहरावावर बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, त्यांच्याकडे दुसरे प्रश्न शिल्लक नाहीत. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघात पाच वर्षात काय केलं? हे सांगावे.वृत्तसंंस्था