Municipal election : महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. यामध्ये पुण्या-मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरांतील महापालिकांचाही समावेश आहे. या निवडणुका येत्या सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात होण्यार असल्याचा दावा भाजपमधील सूत्रांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:08 am
महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

पुण्यातील भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागण्याचे निर्देश दिल्याचा दावा

#पुणे

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. यामध्ये पुण्या-मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरांतील महापालिकांचाही समावेश आहे.  या निवडणुका येत्या सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात होण्यार असल्याचा दावा भाजपमधील सूत्रांनी केला आहे.

राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल, याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे. असे असतानाच महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचे बिगूल आता लवकरच वाजणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. राज्यात येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागणार असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकांबाबत पुण्यात भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीकडे स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देणार असल्याचीदेखील चर्चा आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टिकोनाने तयारीला लागण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

काही महापालिकांचा कार्यकाळ तर कोविड काळातच संपला आहे. पण तरीही निवडणूक आयोगाकडून अद्याप महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे दोनेक आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यालयालयानेदेखील महाराष्ट्रातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप न घेतल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कान पिळले होते. या न्यायालयाने तातडीने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिले होते. मात्र, तरीही या निवडणुकांचे बिगूल वाजू शकले नाही.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्वसामान्यांना सहज पचनी पडणार नाहीत, अशा घडामोडी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात  घडल्या. शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपने ३६ तासांचं सरकारही स्थापन केलं. पण पुढे अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की ते सरकार फार काळ टिकलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर भाजपकडून सातत्याने ‘‘हे सरकार फार काळ टिकणार नाही,’’ असे दावे करण्यात आले.

मार्च २०२० पासून कोविडचे संकट उभे ठाकले. या संकटानंतर नऊ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह बंड पुकारलं. ते सर्व आमदारांना घेऊन सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचं नवं सरकार स्थापन झालं. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळालं.

या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील राजकारण्यांची खरी परीक्षा असणार आहे. कारण राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रंगणार आहेत. या निवडणुकांमधून नागरिकांचा नेमका कल काय आहे? ज्या राजकीय घडामोडी एका वर्षात घडल्या, त्याबद्दल नागरिकांना काय वाटते, हे या निवडणुकीतील मताच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणूक असंही मानलं जातं. कारण या निवडणुकीत महाराष्ट्राचा नेमका मूड काय? हे समोर येणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागून आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest