मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे आज लोकार्पण

मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे आज (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 12 Jan 2024
  • 11:15 am
MTHL

संग्रहित छायाचित्र

अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबईत

मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे आज (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवरून चारचाकी वाहनांना अधिक वेगाने धावता येणार आहे. म्हणजे या चारचाकी वाहनांना ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने जाता येणार आहे, तर मोटारबाईक, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर आदी वाहनांना या सागरी सेतूवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (MTHL)

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार, टॅक्सी, हलकी मोटर वाहने, मिनीबस आणि दोन एक्सल बसेस आदी वाहने या सागरी सेतूवरून ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहेत. मात्र, या वाहनांना पुलावर चढण्याचा आणि उतरण्याचा वेग ताशी ४० किलोमीटर ठेवावा लागणार आहे. धोका, अडथळे आणि जनतेची असुविधा टाळण्यासाठी देशातील सर्वात लांब सागरी मार्गावरील पुलावर वेगाची मर्यादा लागू करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या वाहनांना नो एन्ट्री
१८ हजार कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या शिवडीतून सुरू होऊन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपणार आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टीएक्सल असलेली अवजड वाहने, ट्रक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसेस ईस्टर्न फ्री वेवर जाऊ शकणार नाहीत. या वाहनांना मुंबई पोर्ट -शिवडी एक्झिटचा (एक्झिट १ सी) वापर करावा लागणार आहे. आणि पुढे जाण्यासाठी गडी अड्डाच्या जवळ एमबीपीटी रोडवरून जावं लागेल. या सागरी सेतूवरून मोटारसायकल, मोपेड, तीन चाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर, जनावरे वाहून नेणारी वाहने, धीम्या गतीने चालणाऱ्या  वाहनांना एन्ट्री नसणार आहे.

अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबईत
एमटीएचएल एक हा सहापदरी सागरी सेतू आहे. याचा १६.५० किलोमीटरचा भाग समुद्रावर आणि ५.५ किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे. या सागरी सेतूमुळे अवघ्या २० मिनिटांत मुंबईतून नवी मुंबईत पोहोचता येणार आहे. दुसऱ्या मार्गाने मुंबईतून नवी मुंबईला गेल्यास दोन तास लागतात. पण या मार्गावरून गेल्यावर एक तास २० मिनिटे वाचणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest