एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांची साद !; प्रतिनियुक्तीवर आलेल्या सचिव व सहसचिव यांना पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी ''एक्स'' मोहिम
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांची भरती प्रक्रिया रखडली आहे. तसेच परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रतिनियुक्ती वर आलेल्या सचिव व सहसचिव यांच्या कारभारामुळे आयोगाचा कारभार विस्कळीत झाला असल्याने याचा नाहक त्रास उमेदवारांना होत आहे. तसेच आयोगाचे अंतर्गत राजकारण हे देखील याला कारणीभूत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्ती वर आलेल्या सचिव व सहसचिव यांना पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून सोमवारी (दि. ६) ''एक्स'' मोहिम राबविली जाणार असल्याचे सीविक मिररला सांगितले.
एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल जाहीर करताना नियमांकडे केलेले दुर्लक्ष, आरक्षणाच्या नावाखाली पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा, जाहिरात प्रसिध्द होऊनही अद्याप परीक्षेची तारीख न सांगणे, आदी प्रश्नांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थी हवालदिल झाले आहे. भरती प्रक्रियेला दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने आर्थिक खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. असे असताना विद्यार्थी व्याकुळ होऊन एमपीएससीला भरती प्रक्रिया जलद गतीने राबविण्याची मागणी करत आहे. मात्र एमपीएससीच्या सचिवांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून उलट उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी संतापले असल्याचे सध्याचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करुन एकूण १८ मुद्दे काढले असून यावर एमपीएससीच्या अध्यक्षांनी निर्णय घेवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच भरती प्रक्रिया रखडण्यामागे मंत्रालयातून एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि एमपीएससीचे अधिकारी यांच्या राजकारण सुरु आहे, तसेच धुसपूस असल्याने कामे होत नाही. असा आरोप विद्यार्थ्यांकडून होत असल्याने प्रतिनियुक्तीवर आलेल्या सचिव व सहसचिव यांना पदावरुन हटविण्याच्या मागणी विद्यार्थ्यांनी केली असून त्यासाठी सोमवारी ''एक्स'' मोहिम राबविण्यात येणार आहे.
राज्यसेवेच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अजूनही घोषित झालेली नाही. मागील अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबीत आहे. दर महिन्याला मला सात ते १० हजार रूपये खर्च येत असून, पुण्यात राहावे का नाही. हाच मोठा प्रश्न आहे. एमपीएससीला घटनात्मक स्वायत्तता असतानाही ते विद्यार्थी हिताचे काम का करत नाही. अशी भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.
प्रलंबित प्रश्न ः
१) पसंती क्रमांका बाबत चुकीची प्रक्रिया
२) कर सहाय्यक पदाचा लावलेला चुकीचा निकाल
३) पीएसआयपदी अपात्र खेळाडूंची निवड
४) गट क लिपिक पदाचा निकाल आणि कौशल्य चाचणी रखडली
५) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ची सुधारित तारीख कधी घोषित होणार
६) संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ची जाहिरात
७) पीएसआय (२०२२) मैदानी चाचणीची तारीख
८) खात्यांतर्गत पीएसआय पदाचा निकाल
९) ऑप्टिंग आऊटचे सुधारित धोरण
१०) वेळापत्रकाची अंमलबजावणी न होणे
११) निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत
१२) रखडलेल्या मुलाखतींची माहिती नाही
१३) प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून, उमेदवारांचे नुकसान होत आहे
१४) रखडलेल्या परीक्षांबाबत अजून कोणतीही घोषणा नाही
१५) काही पदांचे एक ते दोन वर्षांपासून अभ्यासक्रम घोषित नाही
१६) पीएसआय २०२१ चा अंतिम निकाल लावला जात नाही
१७) प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत चुकीची माहिती
१८) कृषी सेवा राजपत्रित २०२२ अंतिम निकाल सहा महिन्यांपासून प्रलंबित