वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय : विनोद तावडे
पुणे: प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण, गेल्या निवडणुकीत राहुल गांधींना (Rahul Gandhi) अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचा धडा घेत यंदाच्या निवडणुकीत वायनाडमधील चित्र समजून घेतल्यानंतर वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी शुक्रवारी (दि.३ ) केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालापाचे आयोजन केले होते. त्यावेळी तावडे यांनी देशभरातील अनेक राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. यावेळी तावडे यांना राहुल गांधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याबाबत विचारले असता, तावडे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. अशा शब्दात टीका केली.
मुळचे भाजपचे पण मतभेदानंतर राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुन्हा घर वापसीवरुन चांगली चर्चा रंगली आहे. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये दिल्लीत प्रवेश दिला जाणार असल्याचे खुद्द खडसे यांनीच जाहीर केले होते. मात्र खडसे यांचा अद्याप प्रवेश झालेला नसतानाही त्यांनी लोकसभेचा प्रचार सुरु केला आहे. त्यावर तावडे यांना विचारले असता, खडसेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीस-बावनकुळे यांचा विरोध नाही. खडसे यांच्या भाजप प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोणताही विरोध नाही. असे विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून राज्यातील निर्णय घेतले जातात. आमच्याकडे टीमवर्क आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी आमचा विश्वासघात केला. शिवसेनेतील ठाकरे गट नं. म्हणून आम्ही आकड्यांकडे गेलो. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यात आला. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
देशभरात लोकसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठका होत आहेत. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे आमचे अधिकारी व कार्यकर्ते बूथवर काम करताना दिसतात, तर विरोधी पक्षांना बूथवर अधिकारी व कार्यकर्ते सापडत नाहीत. २० ते ३० टक्के बूथवर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. आपण कितीही आणि काहीही केले तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, अशी भावना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे या वर्षी आपण निश्चितपणे ४०० चा टप्पा पार करू. देशात 'येणार तर मोदी' असे वातावरण आहे, असे तावडे म्हणाले.
महायुतीला ४० जागा मिळतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक राजकारण करत नाहीत. भाजप पूर्णपणे बेरीचे राजकारण करत आहे. त्यामुळे माने यांना सोबत घेण्यात आले. भाजपला महिला मतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांचा पाठिंबा आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीला ४० जागा मिळतील. असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा बनवत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे. त्याचबरोबर दिल्लीत गेल्यानंतर दृष्टीकोन बदलला आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरणार नाही, असेही तावडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.