संग्रहित छायाचित्र
अमोल अवचिते
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुण्यातील पोलीस यंत्रणेवरील ताण हलका होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची शारीरिक चाचणी १३ मे नंतर आयोजित करावी. तसेच ही प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी पार पाडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना केली आहे.
एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएसआय पदाची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली. तब्बल एक वर्षाने मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र एमपीएससीच्या उदासीन कारभारामुळे मैदानी चाचणीला मुहूर्त लाभला नाही. लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासनावर ताण असतो. याचा विचार करुन एमपीएससीने मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर करणे आपेक्षित होते. मात्र कोणतेही नियोजन न करता तारीख जाहीर केली. त्यानंतर पु्न्हा १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली. मात्र राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले आहे. हे विचारात घेता शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रक प्रसिध्द केले होते. त्यावर एमपीएससी प्रशासनाला नियोजन करता येत नसून त्यांनी मार्गदर्शन घेण्याचा विद्यार्थ्यांनी संतापजनक सल्ला दिला होता.
आता दोन वेळा शारीरिक चाचणीची तारीख पुढे ढकलल्याने एमपीएससीने योग्य नियोजन करुन शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी घ्यावी. तसेच तशी तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. पुण्यात १३ मे नंतर मैदानी चाचणी राज्य राखीव बल (एसआरपी) येथील मैदानावर चाचणी घेतली तर पोलीसांचे मनुष्यबळ देखील उपलब्ध होईल. यापूर्वी देखील एमपीएससीने मैदानी चाचणी या मैदानावर घेतली आहे. त्यामुळे केवळ मुंबईमध्येच चाचणी घेण्याचा एमपीएससीने हट्ट सोडावा आणि नियोजन करावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
पुण्यात सोयीसुविधांमुळे गाव सोडून फक्त मैदानी चाचणीच्या सरावासाठी आलो आहे. महिन्याला १० ते १५ हजार रुपये खर्च होत आहे. मैदानी चाचणी पार पडली तर पुन्हा गावात जाऊन राहता येईल. एमपीएससीने पुण्यातच आता मैदानी चाचणी घ्यावी आणि लवकर तारीख जाहीर करावी.
- उमेश, विद्यार्थी
पीएसआय पदाची भरती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मैदानी चाचणी रखडली आहे. दिवसातून दोन वेळा मैदानी चाचणीचा सराव करावा लागतो. त्यामुळे आरोग्यावर होणारा खर्च परवड नाही. परिस्थिती नसताना पुण्यात राहत आहे. याचा विचार करून तरी एमपीएससीने आता मैदानी चाचणी मे महिन्यातच घ्यावी.
- राजेश, विद्यार्थी.
पीएसआयच्या मैदानी चाचणीला लागणार्या दिरंगाईमुळे हे सगळे सोडून घरी यावे, असे घरचे सांगत आहेत. आई वडील लग्न लावून देण्याच्या तयारीत आहेत. पण मला पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आता लोकसभा, त्यानंतर विधानसभा मग महापालिकेच्या निवडणुका हे सत्र सुरूच राहणार आहे. याचा विचार न करता एमपीएससीने विद्यार्थ्यांचा विचार करून पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी घ्यावी.
- गौरी, विद्यार्थ्यीनी
दोन वेळा तारखा पुढे ढकलल्या...
लोकसभा निवडणुकींमुळे पीएसआयची शारीरिक चाचणीची परीक्षा ही १५ ते २७ एप्रिल दरम्यान १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परीक्षा ही २९, ३० एप्रिल आणि आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत मैदानी चाचणी पुढे ढकलली. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचार्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाला माहिती असते. तरी देखील एमपीएससीने कोणतेही नियोजन करता सरसकट तारखा जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन दाखविले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.