संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) एकत्रित घेण्यात येणारी महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षा आता स्वतंत्र पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्धीपत्रकानुसार या दोन गटाची परीक्षेसाठी एकत्रित जाहिरात प्रसिध्द करण्यात येत होती. परंतु परीक्षेच्या निकालप्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे व त्यामुळे निकाल प्रक्रियेस होणारा विलंब यामुळे एमपीएससीने ही परीक्षा स्वतंत्र घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.
संयुक्त गट 'ब' आणि संयुक्त गट 'क' स्वतंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला होता. त्यावेळीच विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्याच वेळी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा न्यायालयीन लढाईत अडकण्याची भीती व्यक्त केली होती. राज्यातील लाखो उमेदवार सरकारी नोकर मिळविण्याचे आशेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. परंतु निकाला आधिच विद्यार्थी न्यायालयात धाव घेत असल्याने परीक्षा वर्षानुवर्षे न्यायालयीन कचाट्यात अडकली आहेत. तसेच सर्व पदांचा एकत्रित निकाल लावल्याने गुणांचा कट ऑफ यामध्ये चांगलाच फरक पडत होता. यामुळे अनेक उमेदावारांची संधी हुकली होती. आता एमपीएससीने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेसाठी १९ जानेवारी, २०२३ रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा प्रथमतः आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, एमपीएससीच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट - ब (अराजपत्रित ) व गट - क संवर्गातील ( वाहनचालक वगळून ) पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त भरण्यासंदर्भात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाने १८ जुलै २०२४ रोजी घेतला आहे. या शासन निर्णयानुसार शासनाच्या विविध विभागातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत केली जाणार आहे. गट ब ( अराजपत्रित ) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची वाढणारी संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील आलेल्या तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, त्या अनुषंगिक न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब. या सर्व बाबींचा सर्वकष विचार करून गट-ब (अराजपत्रित ) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. गट - ब व गट - क सेवांकरीता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहील. परंतु गट-ब व गट-क असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येईल. असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार गट ब ( अराजपत्रित ) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. त्याअनुषंगाने संबंधित सेवेच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही आयोगाकडून करण्यात येणार आहे. असे एमपीएससीने प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
गट ब आणि गट क पदाच्या परीक्षा वेगवेगळ्या घ्याव्यात, अशीच विद्यार्थ्यांची मागणी होती. आता स्वतंत्र परीक्षा घेतल्यामुळे लाखो विध्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यामुळे विध्यार्थ्यांच्या संधी कमी झाल्या होत्या. याचा परिणाम विध्यार्थ्यावर होत होता. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्या बद्दल एमपीएससीचे आणि राज्य सरकारचे आभारी आहोत.
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.