मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, असा ठाम दावा ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. २४) केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 05:58 am
मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू

संजय राऊत, छगन भुजबळ यांचा ठाम दावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शक्यता फेटाळली

#मुंबई 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, असा ठाम दावा ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. २४) केला.

राऊत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीविषयी भाजप नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या हालचाली दिल्लीत नक्की सुरू आहेत. याची माहिती मलाही आहे. छगन भुजबळ यांना याबाबत अधिक माहिती असेल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून का हटवले जात आहे, याची कारणेही मला माहिती आहे. राज्याचे नेतृत्व करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत.’’

आमचे सरकार पाडण्याचे भाजपचे काम एकनाथ शिंदेंनी पूर्ण केले. त्याचा भाजपला नक्कीच फायदा झाला असल्याचा दावा करून राऊत म्हणाले, ‘‘ मात्र, त्यानंतर भाजपला पाहिजे ते साध्य करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केल्यानंतर राजकीयदृष्ट्या भाजपला ताकद देण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. राज्यात मिंधे गटासोबतच भाजपही रसातळाला जात आहे. याची भाजपला आता धास्ती 

वाटत आहे.’’

छगन भुजबळांनीही संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा दिला. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून हे सरकार गडगडणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. भुजबळ यांनी मात्र असे काही होणार नसल्याचा अंदाज वर्तवला. ते म्हणाले, ‘‘

राज्य सरकार कोसळणार नाही. मात्र, मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची दाट शक्यता आहे. ’’

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान १६ आमदार अपात्र ठरवले तर शिंदे गटाला बहुमतासाठी १४९ आमदारांची गरज असेल. सत्ताधारी गटाकडे सध्या १६५ आमदार आहेत . त्यामुळे सरकार त्यांचेच राहील, मुख्यमंत्री बदलू शकतात. मात्र, सरकारला धोका नाही, असे लक्षवेधी वक्तव्य भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, ‘‘१६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल गेलाच तर मुख्यमंत्री शिंदेदेखील अपात्र ठरतील. ते मुख्यमंत्रिपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल, पण या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्या विरोधात निकाल जाईलच याची काय खात्री? जर समजा तसा निकाल आलाच तर मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकारला बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा आहे.’’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरू असल्याचा दावा शिंदे गटाने साफ शब्दांत फेटाळून लावला. हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाने जोरदार पलटवार केला. ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार, असा दिल्लीहून अमित शहांचा फोन संजय राऊतांना आला होता का, असा सवाल शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest