Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 8 May 2023
  • 02:04 am
शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते...

शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते...

जयंत पाटलांच्या वक्तव्याने फुटले नव्या वादाला तोंड, शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका

#सांगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधले वादळ शमल्यानंतर जयंत पाटील हे सध्या आपले होम ग्राऊंड असलेल्या  सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे वादळ निर्माण झोले होते. मात्र, बरेच लोक त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते. जे होत आहे, ते व्हावे, अशी काहींची इच्छा होती.’’ पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आता नव्या 

चर्चेला तोंड फुटले आहे. हे लोक कोण, पक्षातले की पक्षाबाहरेचे, असे प्रश्नही जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित झाले आहेत.

शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. हा एक धक्काच होता. ज्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो. त्यावेळी आपले ध्येय होते, एक विचार होता. साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आपण सर्व अस्वस्थ झालो. आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून त्यांना  राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारली, असे पाटील यांनी नमूद केले.

यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ‘‘शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे. पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत होते आणि या पुढेही जोमाने लढत राहणार. देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याची चिंता, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० वीरांनी करायला हवी,’’ असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र, ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. मात्र, माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे ध्येय आहे, असा दावादेखील जयंत पाटील यांनी केला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest