संग्रहित छायाचित्र
मुंबई: मध्य प्रदेशमधील तत्कालिन शिवराजसिंह सरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात महिलांवर विशेष कृपादृष्टी ठेवल्याचे दिसते.मुख्यमंत्री लाडकी बहीण, अन्नपूर्णा आदि योजनांची घोषणा करताना पूर्वीच्या महिला केंद्रीत योजनांनाही त्यांनी उजाळा दिला आहे. महिलांना दरमहा १५०० रुपये देणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवेळीच वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करताना सरकारने त्यांच्या मतावर डोळा ठेवल्याचे दिसते.
अजित पवार यांनी मध्य प्रदेशातल्या लखपती दीदी प्रमाणेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली. महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्यासाठीच्या योजना राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृयोजना आपण आणल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केलं.
वर्षाला तीन सिलिंडर मोफत
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ही घोषणा करताना अजित पवार म्हणाले, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. एलीपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढवला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. ही योजना पर्यावरण संरक्षणाला साहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्रात ६ लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या ७ लाख करण्यात येईल. तसेच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
याशिवाय महिला लघुउद्योजिकांनी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. १२७ किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या आर्थिक वर्षात आणखी ३७ किलोमीटर लांबीच्या मार्गिका खुल्या करण्यात येतील, असेही अजित पवार म्हणाले.
अतिरिक्त अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, पेट्रोल- डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के प्रस्तावित केला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रतिलिटर ५ रुपये १२ पैसेवरून २५ टक्के अधिक प्रतिलिटर ५ रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे, डिझेल दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रतिलिटर स्वस्त होणार आहे.
तसेच पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा अंदाजे १२ हजार जवानांना लाभ होण्याची शक्यता आहे.
नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २% वरून १% करण्यात येणार आहे. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
अर्थमंत्री म्हणाले, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतील. योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू होईल. मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी सरकार १०० टक्के शुल्क माफ करणार आहे.
अजितदादांची शेरो-शायरी
शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देता यावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याचे अजितदादांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी मोफत शब्दावर भर दिला. तसंच यानंतर एक शेरही त्यांनी सादर केला. ते म्हणाले, तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है. चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते है! त्यानंतर काही वेळाने हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को, साथ लेकर चलो. हा दुसरा शेरही सभागृहास ऐकवला.
अर्थसंकल्पाची सुरुवात अभंगाने
अर्थमंत्री अजित पवार यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधिमंडळ भक्तीमय झाले. महाराष्ट्राची जगभर दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
प्रतिदिंडी २० हजार निधी
अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद वारकऱ्यांसाठी केली असून देहू-आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मोफत औषधं दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणाही अजितदादांनी केली.
वारकऱ्यांना माफक दरात जेवण
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे शुक्रवारपासून उपाहारगृह सुरू केले असून विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवासात माफक दरात जेवण मिळणार आहे. पंढरपुरात भाविकांची हॉटेलधारकांकडून होणारी लूट यामुळे थांबणार आहे. उपाहारगृहात फक्त शंभर रुपयात पोटभर जेवण मिळेल.
महिलांसाठी योजना
- महिलांसाठी राज्यात १० हजार पिंक रिक्षा
- महिलांना बस प्रवासात सवलत.
- महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत.
- वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलिंडर मोफत
- बचत गटाचा निधी १५ वरून ३० हजार
- २५ लाख महिला लखपती दीदी