संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Budget 2024-2025) सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी काही महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना:
पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी 'मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना' वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पवार म्हणाले, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अन्नपुर्णा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी करायच्या असतील, तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. एलपीजी गॅसचा वापर यादृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. ही योजना पर्यावरण संरक्षणालाही सहाय्यभूत ठरेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:
महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेची घोषणा करत असल्याचं पवार यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत २१ ते ६० या वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असून या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल अशी घोषणा पवार यांनी केली. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पिंक ई-रिक्षा योजना:
महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा' योजना देखील जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत १७ शहरातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजना:
महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ पासून 'लेक लाडकी' ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम प्रदान करण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येते.