संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Budget 2024-2025) सादर केला. वित्तमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला आहे. अर्थसंकल्पात त्यांनी वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने त्यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. यावर्षीपासून प्रती दिंडी २० हजार रूपये देणार असल्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात केली. तसेच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच निर्मल वारी साठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ:
२०२३-२४ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. किर्तनकार, वारकरी, भजनीमंडळ यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 'मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ' स्थापन करण्यात येईल अशी घोषणा पवार यांनी अर्थसंकल्पात केली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचारही केले जाणार आहेत असे पवार यांनी जाहीर केले.
तसेच, महाराष्ट्राची ओळख म्हणून जगभर दखल घेतल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीला 'जागतिक वारसा नामांकना'साठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.