पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: पोलिसांच्या चुका दाखवताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फडणवीसांनी केले कौतुक

पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेवर राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. याबाबतच्या विधिमंडळातील प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या चुका दाखवल्या. तसेच वरिष्ठांनी चांगले काम केल्याचे सांगत त्यांचे कौतुकही केले.

संग्रहित छायाचित्र

पोर्शे अपघात प्रकरणी विधिमंडळात गृहमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर

पोर्शे कार अपघातानंतर (Kalyaninagar Porsche Car Accident) पोलिसांच्या भूमिकेवर राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. याबाबतच्या विधिमंडळातील प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या चुका दाखवल्या. तसेच वरिष्ठांनी चांगले काम केल्याचे सांगत त्यांचे कौतुकही केले.

पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी  आरोपीला ताब्यात घेत रक्ताचा नमुना घेतला. नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचे लक्षात आल्यावर त्यात गडबड असल्याचा संशय आला. पोलिसांनी आरोपी, वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला. त्यातील बदल पाहिल्यावर डॉक्टरांना अटक केली. त्यात एकाने ३ लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचे कबूल केले. आरोपपत्रात क्रॅश इम्पॅक्ट ॲनालिसिस होते. मुलाने ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग ११० किलोमीटर प्रतितास एवढा आहे. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तो बारमध्ये होता तेथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाही. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना गाडी चालवायला दिल्याने कारवाई करण्यात आली. त्याच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली, त्याला घरात कोंडूनही ठेवलं. वडील, आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पहिल्यांदा पोलिसांनी ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठांनी भेट दिल्यावर ३०४ चा गुन्हा दाखल केला. ज्युवेनाईल बोर्डासमोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. त्याची जन्मतारीख १४ सप्टेंबर २००६ असून त्याचं वय १७ वर्ष ८ महिने आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती पोलिसांनी केली.

पोलिसांच्या चुकीवर बोट ठेवताना फडणवीस म्हणाले, आरोपीला रात्री ३ वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं. पोलिसांनी सकाळी साडेआठला पाठवलं. साधारणपणे अपघात प्रकरणात ३०४ अ लावतात. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना आधी कळवायला हवं होतं. त्यामुळे ड्यूटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधितांना निलंबित केलं आहे. पुण्याच्या परिसरात ७० पबवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी परवान्याच्या अटी-शर्थींचं उल्लंघन केले आहे, त्यांचे परवाने रद्द केले आहेत. कॅमेऱ्यातून किती वाजता पब बंद केला, गिऱ्हाइकांना दारू देताना वय तपासले की नाही या बाबी तपासल्या जात आहेत. प्रवेश देतानाही वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश दिले आहेत.वय तपासणीशिवाय प्रवेश दिला तर  कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest